ब्रिगेडियर सुधीर सावंत लेख..
दसरा म्हणजे जल्लोष. यावर्षी तर वेगळीच गंमत झाली. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सालाबाद प्रमाणे मेळावा शिवाजी पार्कला झाला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जवळजवळ एक लाख लोक हजर होते. दुसरीकडे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा झाला. त्याला दोन लाख लोक हजर होते. ही अस्तित्वाची लढाई आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी नवीन पक्ष निर्माण केला आहे. त्यात ५० आमदार त्यांनी संघटित केले. १४ आमदार उद्धव ठाकरेकडे उरले. १२ खासदार देखील शिंदे साहेबांबरोबर काम करत आहेत. किती कोणी टीका केली किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केले. तरी एक सत्य लपवता येत नाही. अशाप्रकारे जर पैसे देऊन आमदार खासदार फुटत असतील, तर प्रत्येक पक्षाचे आमदार खासदार फोडता येतात. शरद पवार यांनी एकही आमदार सोडला नसता. म्हणून केवळ पैशावर आमदार होतात आणि खासदार फुटतात या गोष्टीला तेवढे महत्व देता येत नाही. पण आमदार खासदार फुटायला सर्वात मोठी गोष्ट असते, ती म्हणजे विश्वासहर्ता. आमदार किंवा कार्यकर्ते असो ते पक्षाकडून फुठायचे झाले, तर पक्षावरील निष्ठा संपल्यामुळे फुटतात. ज्या पक्षांमध्ये ते काम करत असतात तिथे आपल्या अस्तित्वाला धोका आहे किंवा त्या पक्षामध्ये आपले भविष्य दिसत नाही म्हणून आमदार फुटतात.
भारताची लोकशाही आता अत्यंत धोक्यात आहे. त्याचे कारण म्हणजे निष्ठा या नावाला काही किंमत उरलेली नाही व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना गुलामासारखे वागवतात. स्वतः मालक आणि कार्यकर्ते गुलाम अशी अवहेलना केली जाते. शिंदे साहेबांनी यावर बरोबर बोट ठेवले आहे. नेते कार्यकर्त्यांला म्हणतात की मी तुम्हाला आमदार केले, तुम्हाला खासदार केले, किती माझे तुमच्यावर उपकार आहेत आणि तुम्ही असं केलं, गद्दारी केली. असे म्हणणे कितपत योग्य आहे हे सर्वांनी पडताळून पाहिले पाहिजे. कारण कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने काम करतात, पक्ष ते वाढवतात नेते नाही. घरा घरामध्ये जाऊन जनतेशी थेट संपर्क असणारे कार्यकर्तेच असतात. जनतेचे काम सुद्धा कार्यकर्तेच करतात. नेते भेटत सुद्धा नाहीत. दुर्दैवाने भारताच्या राजकारणात पक्षांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकली आहे. मी त्यातील एक बळी आहे. सोनिया गांधीसाठी मी अत्यंत निष्ठेने काम केले. कारण राजीव गांधींनी मला राजकारणात आणले होते. वास्तविक त्यात सोनिया गांधीचा काही रोल नव्हता. तरी मी राजीव गांधीवर निष्ठा ठेवली हे बरोबर आहे. सोनिया गांधीवर निष्ठा ठेवण्याचे मला काही गरज नव्हटी. पण मी ती चूक केली. त्याचे बक्षीस मला मिळाले. आमदारकीचा राजीनामा देऊन मला पक्ष सोडावा लागला. कारण आमच्या सर्वांच्या मागणी विरोधात नारायण राणे यांना पक्षात घेण्यात आले. सोनिया गांधींसाठी मी प्रचंड त्याग केलेला आहे. दसरा संमेलनात हा विषय राहून राहून पुढे आला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले शिंदे गद्दार आहे. शिंदे यांनी पलटवार करत असताना स्पष्ट केले की, त्यांनी काम करून पक्ष वाढवला. उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा दिला. पण त्यांची आणि ५० कार्यकर्त्यांची अवहेलना पक्षाकडून झाल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला व त्यांच्या बरोबर ५० पेक्षा जास्त आमदार गेले. जर एका पक्षातून ४० आमदार जात असतील तर निश्चितपणे शिंदे सारख्या नेत्यांची लोकप्रियता प्रचंड आहे.
यातून पक्षांतर्गत लोकशाहीचा प्रश्न समोर आलेला आहे. आमदार हे कुणाचे प्रतिनिधी असतात? जनतेचे? की पक्षाचे? मी खासदार असताना एक फार मोठा विषय समोर आला. हायकोर्टच्या न्यायाधीशावर लोकसभेत खटला चालला. मी भाषण केले की जर एक न्यायाधीश भ्रष्ट असेल तर लोकांचा विश्वास न्याय व्यवस्थेवरून उडून जाईल. म्हणून त्या न्यायाधीशाला बडतर्फ केले पाहिजे. तामिळनाडूचे लोक सोडले तर सर्वच त्या न्यायाधीशाच्या विरोधात मतदान करणार होते. मतदान करायची वेळ संध्याकाळी पाच वाजता आली आणि अचानक पक्षाकडून निरोप आला की न्यायाधीशाच्या बाजूने मतदान झाले पाहिजे. मग जाणीवपूर्वक आम्ही लोकांनी न्यायाधीशाला वाचवले. पहिल्यांदाच मी माझ्या मनाविरुद्ध मतदान केले. कारण भारताच्या लोकशाहीमध्ये पक्ष श्रेष्ठ असतो. प्रतिनिधी कनिष्ठ असतो. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये जसे खासदार आपल्या मनाप्रमाणे मतदान करतात, कधी कधी पक्षाचा आदेश झुगारून टाकतात. म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये लोकशाहीचे जिवंत स्वरूप आहे. तर भारताच्या लोकशाहीमध्ये संसदेत आणि विधिमंडळात आपल्याला लोकशाहीचे विकृत स्वरूप बघायला मिळते.
म्हणून आजच्या लोकशाही समोर प्रश्न आहे, खासदार आमदार जे लोकांचे प्रतिनिधी असतात. यांनी लोकांच्या मताप्रमाणे मतदान केले पाहिजे, पक्षाच्या आदेशावरून मतदान करू नये. सर्व पक्ष मागणी करतात की सर्वांनी पक्षाच्या आदेशावरून मतदान केलं पाहिजे. आता तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान नाही तर उघड मतदान करावे लागते आणि कुठल्या पक्षाला आपण मत दिले हे दाखवावे लागते. जो खासदार किंवा आमदार आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करतो त्याला गद्दारीची उपमा द्यायला त्यांचा पक्ष जराही विलंब लावत नाही.हे निवडून आलेले असले तरी गद्दार ठरतात. ज्याच्याशी तुमची निष्ठा आणि प्रेमाचे संबंध होते. त्याला तुम्ही बदनाम करून टाकता. माझं मत स्पष्ट आहे आमदार हा जनतेचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याला मतदान करायला पूर्ण स्वतंत्र पाहिजे. निवडून आल्यावर आमदार खासदाराला विफच्या बडग्याखाली गुलाम करून टाकण्यात येते. पक्षाचे नेते आमदार खासदारांना नाचवतात, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. यामुळे निवडणूक कायद्यामध्ये बदल करताना विफची प्रथा काढून टाकली पाहिजे.
मग असा आरोप होतो की आमदार खासदार भ्रष्ट असतात, त्यामुळे त्यांना विरोधक विकत घेऊ शकतात. असा विचारच लोकशाहीच्या विरोधात जातो. आमदार खासदार हे भ्रष्ट आहेत आणि कुणीही त्यांना विकत घेऊ शकते आणि म्हणून निवडणूक कायद्यामध्ये आमदार यांनी भ्रष्टाचार करू नये. म्हणून विफची प्रथा आलेली आहे. जर आमदार खासदार हे भ्रष्ट आहेत, याच पायावर जर लोकशाही उभी असेल, तर तुम्ही स्पष्टपणे मान्य करत आहात की लोकशाही ही नावापुरतीच आहे. लोक ज्यांना निवडून देतात हे भ्रष्ट असतात, म्हणून लोकशाही बरखास्त करावी का? या प्रश्नाला कधीच उत्तर मिळत नाही. त्याचे कारण असे आहे. लोकशाही पद्धत ही भ्रष्टाचाराची पद्धत असेल तर त्याला पर्याय म्हणजे हुकुमशाही. या परिस्थितीमुळे जगामध्ये लोकांचा कल हुकूमशाहीकडे वळत चाललेला आहे. अमेरिका ही जगातील पहिली लोकशाही. तिथे ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी लोकशाही नष्ट करून कायम अध्यक्ष राहण्याचा प्रयत्न केला. रशियामध्ये कुटीन, चीनमध्ये डी पिंग अशाअनेक देशांमध्ये हुकूमशाही आहे. पाकिस्तान मध्ये सैन्याची हुकूमशाही आहे. तसेच इराण, इराक, सौदी अरेबिया, इजिप्त आणि अनेक देशांमध्ये हुकूमशाही नांदत आहे. हुकुमशाहीच्या जाचामुळे जगामध्ये लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
तोडफोडीच्या राजकारणामध्ये सर्वात मोठे तज्ञ शरद पवार आहे. अनेक वेळा त्यांनी तोडफोड करून सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यावर टीका करणे ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. पुढे जाऊन अजित पवारने याबद्दल वक्तव्य करणे म्हणजे त्यांची स्मृती भंग झाली असावी. फडणवीस बरोबर सरकार स्थापन केल्याचे ते लवकरच विसरलेले दिसते. नाना पाटोळे भाजपमध्ये येऊन काँग्रेसमध्ये अध्यक्ष झाले हे ही विसरलेले दिसतात. शिवसेनेबद्दल काय बोलावे. अनेक वर्ष भाजपबरोबर निवडणूक लढवल्या, सत्तेमध्ये भागीदारी केली आणि आता मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून ठाकरे साहेब समाधान मानत आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये तोडफोड ही होतच राहणार. एकमेकाचे आमदार पळवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार. नगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये सर्रास पळवा पळवी चालते आणि त्यात पक्षाचे नेते समर्थन करतात. मग फुकटचे दुसऱ्याला गद्दार म्हणायचे नाटक बंद करा. आता तुमची सत्ता गेली असेल तर परत निवडून येण्यासाठी प्रयत्न करा. परत निवडून येण्यासाठी एक हुकमी मार्ग आहे. तो म्हणजे लोकांचे काम करणे. पण यांना लोकांचे काम करायचे नाही. यांना फक्त सत्ता पाहिजे. सत्तेतून संपत्ती पाहिजे आणि प्रसिद्धी पाहिजे. मग जनता गेली खड्ड्यात तरी यांना चालते.
मी जे अनेक वर्ष बोलत आलेलो आहे. हे आता मुख्यमंत्री शिंदे बोलले की, दाऊदची माणसं ज्या पक्षांमध्ये आहेत त्यांना जवळ करायचं का अशा पक्षांना जवळ करायचं जिथे गुन्हेगारी मंडळी नाही. सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना, मी नवीन राजकारणात प्रवेश केला. आम्ही माफियांच्या विरोधात एक प्रचंड मोहीम काढली. त्यावेळी आत्ताच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुधाकर नाईकवर हल्ला केला होता. तेच आता राष्ट्रवादीच्या रूपांमध्ये वावरत आहेत. त्या काळात आम्ही माफियाचे समूळ उच्चाटन करणार होतो. पण सुधाकर नाईक यांना दंगल घडवून काढून टाकण्यात आले आणि परत माफीयाचे राज्य या महाराष्ट्रावर स्थापन करण्यात आले. हे काय आम्ही आता विसरलेलो नाही आणि वेळ आल्यावर या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसमोर आणणार आहोत. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना दोन बोटे तुमच्याकडे सुद्धा खुणावतात हे विसरू नका आणि माफीयाचा पाठिंबा कुणाला आहे आणि कोण माफियाला वाढवत आहे, याची पूर्ण चौकशी शिंदे साहेब घडवून आणतील अशी मी आशा करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य स्थापित झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहोत.
एकंदरीत दसरा संमेलनाच्या नावावर प्रचंड मेळावे झाले. आरोप प्रत्यारोप झाले. नेहमीप्रमाणे बाळासाहेबांचे नाव सगळ्यांनी घेतले. त्याला आक्षेप उद्धव ठाकरेंनी घेतला. कुणी कुणाचे नाव घ्यावे हा निष्ठेचा प्रश्न आहे. एका व्यक्तीच्या तत्त्वज्ञानाचा आणि विचारांचा पाईक त्यांचा मुलगा असतो असे नाही. म्हणजे निष्ठेने त्यांचे विचार पुढे चालवतील तेच त्या महापुरुषाचे वंशज असतात. काळच ठरवेल कुणाचे विचार पुढे घेऊन कोण गेले. एक शेवटचा सल्ला राष्ट्रवादीच्या ताब्यात जो जातो त्याचे अस्तित्व शिल्लक राहत नाही हे मी अनुभवाने उद्धव ठाकरे यांना सांगत आहे. आपल्या पक्षाच्या धोरणामध्ये दुरुस्ती करावी.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९