सिंधुदुर्गनगरी
दरवर्षी सातत्याने हवामान बदल होत असल्याने या बदलाचा परिणाम फळ पिकांवर व त्यांचे उत्पादनांवर होत असतो, अशावेळी शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक असलेली आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन शेतकऱ्यांनी संरक्षित करावीत. अधिक माहिती करिता क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन दोडामार्ग तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानांवर आधारित फळपिक विमा योजना आंबा बहार 2021-22 मध्ये दोडामार्ग तालुक्यातील 653 शेतकऱ्यांनी 323 हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये आंबा फळपिकाचे 21 हेक्टर क्षेत्रातील 43 शेतकऱ्यांनी व काजू फळपिकाचे 302 हेक्टर क्षेत्रातील 610 शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. फळपिकांचे विमा संरक्षण कालावधीत झालेल्या हवामान बदलांचे घटकांचे आधारे,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडून काजू फळपिकाची 1 कोटी 37 लाख 28 हजार 824 रुपये व आंबा फळपिकाची 8 कोटी 3 हजार 575 रुपये असे एकूण 1 कोटी 45 लाख 32 हजार 399 रक्कम रुपये शेतकऱ्यांचे खाती विमा नुकसान भरपाई म्हणून अदा केलेली आहे.