सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत भिल्लवाडी ग्रुप मळगांव यांच्यावतीने तसेच मळगांव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बुधवारी विजयादशमी दिनी मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले. मळगाव जुनी चौकी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारुढ मूर्ती उभारण्यात आल्याने मळगावच्या सौंदर्यात भर पडल्याची चर्चा मळगाव पंचक्रोशीत मागील दीड दोन महिने होत आहे.
या पार्श्वभूमीवर विजयादशमीचे औचित्य साधत या शिव मुर्तीच्या पूजनामूळे मळगाव गावच्या धार्मिक स्थळांप्रमाणेच असलेल्या ऐतिहासिक स्थळात अधिकच भर पडली आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्थापनेने मळगाव गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या ऐतिहासिक स्थळाच्या पुजनासाठी भिल्लवाडी ग्रुपसह मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, ग्रा. प. सदस्य आना गांवकर, माजी सदस्य गुरुनाथ गावकर, पांडुरंग राऊळ, निलेश राऊळ, प्रेमनाथ गोसावी, उदय सावळ, बाबल सावळ, प्रमोद राऊळ, उदय जामदार, गोट्या राऊळ यांसह समाजसेवक तसेच मळगांव ग्रामस्थ उपस्थित होते.