राज्यातील शिधापत्रिकाधारकांना २७० रुपयांचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा शहर व जिल्ह्यातील ९ लाख १६ हजार ३७१ कुटुंबांना लाभ होणार आहे. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी १ किलो व १ लिटर पामतेल मिळेल. जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एका महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ८५ हजार ४५४, तर शहरातील ३ लाख ३० हजार ९१७ अशा एकूण ९ लाख १६ हजार ३७१ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
यासाठी राज्य सरकारकडून टेंडर काढण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या चारही वस्तूंचे स्वतंत्र पॅकेट तयार करून घेतले जाणार आहे. नंतर हा एकत्रित माल जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण विभागाच्या गोडाऊनमध्ये आणण्यात येईल. हे पॅकेटनंतर रेशन दुकानदारांमार्फत रेशनकार्डधारकांना देण्यात येणार आहेत. प्रत्येक रेशनकार्डावर एक पॅकेट याप्रमाणे त्याचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली.बाजारभावानुसार सध्या साखर ३८, चणाडाळ ८४, रवा ४५, पामतेल १०० रुपयांना मिळते. याचाच अर्थ २६७ ते २७० रुपयांचे हे पॅकेट राज्य सरकारकडून केवळ १०० रुपयांत मिळणार आहे.