किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक, व नागरिकांनी दर्जेदार कामाबाबत व्यक्त केले समाधान
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक व स्थानिक नागरिकांनी मालवण बंदर येथील जीर्ण जेट्टी च्या ठिकाणी नव्याने अद्ययावत जेट्टी व टर्मिनल इमारती ची मागणी केली होती. या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी युवासेना प्रमुख व माजी पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे व मत्स्य आयुक्त श्री अतुल पाटणे यांच्याकडे अंदाजित रक्कमेप्रमाणे निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन सदर कामास सागरमाला योजनेअंतर्गत दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी एकूण रुपये १०.२३ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला. सदर कामाबाबत पूर्णपणे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर दिनांक ३ मे २०१८ रोजी जेटीच्या कामाचा मे. एस एल ठाकूर या ठेकेदारास व दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी टर्मिनल इमारतीच्या कामाचा मे. विनोद कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला. तदनंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये ही दोन्ही कामे पूर्ण करण्यात आली. सदर ठिकाणी पाईल जेट्टी, टर्मिनल इमारत, वाहनतळ, व धुपप्रतिबंधक बंधारा तसेच या टर्मिनल इमारतीमध्ये तिकीट घर, प्रतीक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, त्याचप्रमाणे तीन वाहनतळांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कामाची दि. २८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती व पुढील काहीच दिवसात या कामाचा लोकार्पण सोहळा करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या होत्या.
या पूर्ण करण्यात आलेल्या मालवण बंदर जेट्टी व टर्मिनल इमारतीच्या कामाबाबत स्थानिक नागरिक, किल्ले वाहतूक होडी संघटना तसेच पर्यटकांमधून देखील दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त केले जात असून आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले जात आहेत.