*राजकारणाच्या भांगेतील तुळस -*
*भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री- ११८ वी जयंती विनम्र अभिवादन*
प्रसंग-१
१९६५ मधली घटना आहे. स्थळ- दिल्लीच्या एका महाविद्यालयातील प्रवेशाची रांग. या रांगेत बराच वेळ उभा राहून चक्कर आल्याने एक युवक खाली कोसळला.ताबडतोब काही जणांनी धावत जाऊन त्याला पाणी पाजले आणि त्याचे नाव विचारले.नाव ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.ही बातमी महाविद्यालयाच्या प्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. युवकाचे नाव ऐकताच ते पण धावत आले.कोण होता हा युवक? की ज्याचे नांव ऐकून प्राचार्यही धावत आले? महाविद्यालयात तासनतास प्रवेशासाठी उभ्या असलेल्या या युवकाचे नाव होते – अनिल लालबहादूर शास्त्री!
होय, देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा महाविद्यालय प्रवेशासाठी चक्क अन्य विद्यार्थ्यांबरोबर रांगेत उभा होता.या गोष्टीवर आज कोणीही विश्वास ठेवणार नाही.पण हे सत्य आहे.
प्रसंग २.
१९६६ मधील घटना. पंतप्रधानांची दोन्ही मुले त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यांच्या खासगी मालकीच्या साध्या फियाट गाडीतून जाण्याऐवजी ते पंतप्रधान कार्यालयाची शेव्हरलेट इंपाला ही आलिशान गाडी घेऊन गेले. दुपारी जेवायला घरी आलेल्या पंतप्रधानांना त्यांच्या पत्नींनी ही गोष्ट सांगितली. परत आल्यावर मुलांना वडील नाराज झाल्याचे कळले. सकाळी मुले वडिलांसमोर येण्याची हिम्मत करीत नव्हते. शेवटी वडिलांनीच दोघांना आणि त्यांच्या खासगी सचिवांना समोर बोलाविले. पंतप्रधान कार्यालयाची गाडी काल दिल्लीत खासगी कामासाठी १४ किलोमीटर फिरली आहे. त्याचा शासकीय दराने जो खर्च झाला आहे तो माझ्या मानधनातून कापून घ्या असा आदेश झाला. इकडे दोन्ही मुलांची मान शरमेने खाली गेली. यापुढे अशी चूक करायची नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.ही दोन्ही मुले अर्थातच अनिल आणि सुनील शास्त्री होते आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.
हे अनिल शास्त्री आणि त्यांचे बंधू सुनील शास्त्री वडील पंतप्रधान असतांना देखील महाविद्यालयात बसने जात असत.शासकीय किंवा खासगी कारने नाही. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, राजकारण म्हणजे लांगूलचालन, राजकारण म्हणजे जातीपातीचा, धर्माचा वापर,राजकारण म्हणजे आपले खिसे भरून जनतेची लूट असाच सर्वसामान्य समज असतो.या साऱ्यांच्या पलीकडे स्वच्छ,निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक राजकारण ज्या मोजक्याच लोकप्रतिनिधींनी देशात केले त्यात लाल बहादुर शास्त्री यांचे नाव सर्वोच्च स्थानी होते,आहे आणि राहील.
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ चा. उत्तर प्रदेशातील मुगलसराय म्हणजे आताच्या पंडित दीनदयाल उपाध्याय नगरचा.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ असे मोजके दीड वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.पण आपल्या निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक कार्याने त्यांनी आपल्या कार्याचा ठसा देशात आणि जगात उमटविला. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी परराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्त्वाची खातीही दीर्घकाळ सांभाळली.
त्याआधी स्वातंत्र्यानंतर ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे संसदीय सचिव झाले. उत्तर प्रदेशातच पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात ते पोलीस आणि परिवहन खात्याचे मंत्री झाले. देशातील पहिल्या महिला कंडक्टरची नियुक्ती एस टी मध्ये करण्याचे श्रेय लालबहादूर शास्त्रींना आहे.दंगलीतील संतप्त जमावावर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज ऐवजी पाण्याच्या फवार्याचा वापर त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्याच प्रेरणेने आणि कल्पकतेने सुरु झाला. १९५१ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव झाले. १९५२,१९५७ आणि १९६२ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम केले होते. २७ मे १९६४ ला पंडित नेहरूंच्या अचानक निधनानंतर स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून देशाचे पंतप्रधान पद त्यांच्याकडे चालत आले.याच काळात पाकिस्तानने भारताशी युद्ध छेडले.त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती अशी दारुण स्थिती भारताने पाकिस्तानची केली. एरवी मेणाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्राहून कठोर झाले. त्यांनी तिन्ही दलाच्या सेनापतींना पूर्ण स्वातंत्र्य दिले; त्यांना सांगितले की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी काय करावे हे तुम्ही सांगा, मी त्या आदेशावर सही करतो.त्यांच्या प्रेरणेने भारतीय सैन्याने थेट लाहोरपर्यंत मजल मारली होती.मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे रशियातील ताशकंद येथे पाकिस्तानबरोबर तह करण्यासाठी ते अनिच्छेने गेले आणि ११ जानेवारी १९६६ ला तिथेच त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. साधेपणा,प्रामाणिकपणा, देशभक्ती या गुणांमुळे १९६६ मध्येच त्यांना देशाची भारतरत्न ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली.
१९५१ मध्ये देशाचे रेल्वेमंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.अशी नैतिकता आज कुठे दिसून येते? घोटाळे सिद्ध होतात, शिक्षा होते पण पद आणि शासकीय बंगले न सोडणाऱ्या आजच्या खुज्या, थिट्या राजकारणापुढे शास्त्रीजींची उंची कितीतरी मोठी आहे.
त्यांच्या साधेपणाच्या कितीतरी गोष्टी सांगता येतील. शास्त्रीजी पंतप्रधान असताना त्यांनी एका कापड गिरणीला भेट दिली. शास्त्रीजींना पत्नीसाठी साडी घेण्याची इच्छा झाली.त्या उद्योजकाने गिरणीतील सगळ्यात भारी साडी त्यांना दाखवली मात्र किंमत ऐकून शास्त्रीजींनी ती साडी घेण्यास नम्र नकार दिला आणि ते देऊ शकतील तितक्याच रकमेची साडी घेऊन त्यासाठीचे पैसेही त्यांनी दिले आणि उद्योजकाने विनामूल्य देऊ केलेली सर्वात भारी साडी नम्रपणे नाकारली. स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगात असतांना त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली.तिची सुश्रुषा करता यावी म्हणून लाल बहादूर शास्त्री ब्रिटिशांची परवानगी घेऊन तुरुंगातून काही काळासाठी बाहेर आले.मात्र त्याच दिवशी त्यांची मुलगी मरण पावली.मुलीचे अंत्यसंस्कार आटोपून शास्त्रीजी तडक पुन्हा तुरुंगात गेले.ज्या कामासाठी बाहेर आले होते ते काम शिल्लक राहिले नाही म्हणून ते स्वतः तुरुंगात परत गेले.
एकदा त्याचा मावसभाऊ स्पर्धा परीक्षेला जात असताना घाईगडबडीत तिकीट न घेता रेल्वेत बसला.पकडले गेल्यानंतर त्याने लालबहादूर शास्त्रींचे नाव सांगितले.पोलिसांनी खात्री करण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांना फोन केला.शास्त्रीजींनी तो आपला मावसभाऊ आहे हे मान्य केले परंतु तरीही पोलिसांना नियमानुसार कारवाई करायला सांगितले.पंतप्रधान असताना देखील शास्त्रीजी आपले फाटलेले कपडे शिवून वापरत असत.वरच्या कोटाखाली आत फाटका सदरा असे.फाटलेल्या कपड्यांचे रुमाल करून ते वापरत. स्वातंत्र्य पूर्व काळात ते काँग्रेससाठी पूर्णवेळ काम करीत असत.त्यांना या कामाचे मानधन मिळत असे. या मानधनातून दरमहा काही रक्कम पत्नीकडे शिल्लक राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः पक्षाला पत्र लिहून मानधन कमी करून घेतले.पंतप्रधान झाल्यावर सुद्धा त्यांनी आपली झोपण्याची गादीही बदलली नव्हती.शास्त्रीजींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले पैसे देखील त्यांच्या बँक खात्यात नव्हते इतका साधा पंतप्रधान अजून कोणी झाला नसेल आणि होणार नाही.
ते दीड वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांची आई माहेरी वडिलांकडे राहायला आली. मात्र आजोबांचाही मृत्यू झाला.प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. नावेतून शाळेत पलीकडे जाण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्याकडे पैसे नसत म्हणून आपले दप्तर नावेतील मित्राकडे देऊन ते थेट गंगा नदीत उडी मारून पोहत पलिकडे जात आणि पुन्हा आपलं दप्तर घेऊन शाळेत जात असत.
काशी विद्यापीठात त्यांनी सुवर्णपदकासह शास्त्री मिळवली.तेव्हापासून आपले श्रीवास्तव हे जातीवाचक आडनाव त्यांनी कायमचे काढून टाकले आणि शास्त्री बनले.शास्त्रीजी महात्मा गांधीजींचे कट्टर कार्यकर्ते होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकदा तुरुंगात गेले.महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये “करो या मरो” असा मंत्र दिला परंतु शास्त्रीजींनी त्यात बदल करून “मरो नही मारो” असा बदल करून तो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. पुरुषोत्तम दास टंडन, पंडित गोविंद वल्लभ पंत आणि पंडित नेहरू यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले. “जय जवान जय किसान” हा नारा शास्त्रीजींनी दिला.पाकिस्तान बरोबरच्या युद्धात भारतीय सैन्य थेट लाहोरपर्यंत पोहोचले होते मात्र युद्धविरामासाठी जगभरातून भारतावर दडपण आले व पाकिस्तान बरोबर तहाची बोलणी करण्यासाठी शास्त्रीजी रशियातील ताशकंदला गेले.भारतीय सैनिकांनी जिंकलेली जमीन पाकिस्तानला परत देण्याची अट शास्त्रीजींना अजिबात मान्य नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांनी करारावर स्वाक्षरी केली खरी परंतु त्याच मध्यरात्री त्यांचे रहस्यमय निधन झाले.
त्यांचा आणि महात्मा गांधींचा वाढदिवस एकाच दिवशी येई. याचा कोणी उल्लेख केला की त्यांना संकोच वाटत असे. आपल्यापेक्षा गांधीजींचे कार्य खूप मोठे आहे असे ते विनयाने म्हणत.
*एक इमानदार, साधी राहणी, सरळ, सच्चे, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. राजकारणाच्या भांगेतील तुळस असेच वर्णन त्यांच्या कार्याचे करता येईल. त्यांच्या कार्यास, स्मृतीस,साध्या आचरणास,उच्च विचारसरणीस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏼*
*जय जवान- जय किसान!*
*अप्रतिम ..राजकारणात असे नेते पुनः होणे नाही*
*#संकलन*
*श्री.हेमंत सांबरे*