*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
* आजच्या युगातील अष्टभुजा…*
जवळ जवळ १५/२० वर्षांपूर्वी किंवा त्याच्याही आधी असेल
कदाचित.. सुधा मुर्ती हे नाव एकदम घराघरात पोहोचलं नि
मनामनात जाऊन बसलं.त्यांच डॅालर बहु पुस्तक माझ्या हाती
लागलं नि मला लक्षात आलं की, सुधा मुर्ती हे एक अनन्य
साधारण नाव आहे. त्या काळात, हो , पन्नास वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगचे नि ते ही कम्प्यूटर सायन्स मध्ये शिक्षण घेणे
सोपे काम नव्हते. जात्याच बुद्धिमान असणाऱ्या सुधा मुर्तींना
अशक्य काही नव्हते पण अडथळ्यांची मालिका उभी करण्यात
व एखाद्याचे पाय खेचण्यात आपण चांगलेच पटाईत आहेत हे
आपल्याला चांगलेच माहित आहे. ताईंनी सगळे अडथळे पार
करत शिक्षण पूर्ण केलेच पण त्या नंतर त्यांनी या क्षेत्रात केवढी गरूड झेप घेतली हे पूर्ण जगाला आता ज्ञात आहे.
नुसता उद्योग व्यवसायच नाही तर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात
त्यांचे वर्तन अनुकरणीय आहे. आपण समाजाचे व देशाचे काय देणे लागतो याचे ही त्यांना चांगलेच भान आहे व ते ऋण
तर चुकवण्यात त्या सदैव आघाडीवर आहेत. पाय किती जमिनीवर असावेत व मुळे किती खोल असावित याचे मुर्तिमंत
उदाहरण म्हणजे सुधा ताई आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची जगभर चर्चा व्हावी व त्याची भाषांतरे व्हावित यात
काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही इतकी ती पुस्तके
दर्जेदार आहेत.आज त्या इंफोसिसच्या जागतिक कीर्तीच्या व्यावसायिक आहेत हे सर्वज्ञात आहे. आज त्यांच्या विषयीचे
माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत ते मी सांगण्याची गरज
नाही.
माझा मुद्दा आहे तो आजच्या काळातील, आधुनिक काळातील
दुर्गेचा , अष्टभुजेचा ! शांत संयमी जनकल्याणकारी दुर्गा. ती सुधा ताईंपेक्षा
वेगळी कशी असू शकते? त्यांच्या दैनंदिन जीवनाचे धडे प्रत्येक
भारतियाने गिरवायचे ठरवले तर अवघ्या पाच वर्षात भारताचे
चित्र बदलून जावे एवढे आदर्शवत त्यांचे जीवन आहे कारण त्या आदर्श नुसते बोलत नाहीत तर आचरणात आणतात.
आम्ही आदर्श फक्त बोलतो . कृती मात्र शून्य. कोट्यावधी
रूपयांची ही मालकिण आज ही वर्षातले १/२ दिवस रस्त्यावरील धुळ मातीत बसून भाजी विकते. आणि काही स्टेटस नसतांना आम्ही आमचे स्टेटस सांभाळतो! सुधा ताई
कॅाटनच्या फक्त २/३ साड्या वापरतात. आम्ही मात्र नवदुर्गेच्या
नावाखाली नऊ रंगाच्या साड्यांची हजारोंची उलाढाल करतो.
त्या मात्र गरजूंसाठी कोट्यावधींच्या योजना गाजावाजा न करता राबवतात हाच त्यांच्यातील व आपल्यातील फरक आहे.
इतके आदर्श आमच्या नजरे समोर असतांना आम्ही मात्र न
बदलण्याची शपथच घेतली आहे असे आपले वर्तन आहे .
ए पी जें बरोबर श्रीहरी कोटा येथे काम करणाऱ्या साऱ्या इंजिनिअर स्रिया, ह्यांना कशाची बरे उपमा द्याल? त्या आधुनिक काळातील नवदुर्गा व अष्टभुजाच नव्हेत काय? अंतरिक्ष कार्यक्रमात काम करणाऱ्या शेकडो महिलांचे नाव देखील
आपल्याला माहित नाही.किंबहुना मी तर असे म्हणेन की,पंतप्रधान पदा सह असे कोणते क्षेत्र आहे की जिथे
महिलांनी मैदान गाजवले नाही? या साऱ्या नवदुर्गाच नव्हेत
काय ? बदलत्या काळा नुसार अशाच नवदुर्गांची आपल्याला
गरज आहे.साधना आमटे, सिंधुताई सपकाळ , किरण बेदी
कला क्रीडा रेल्वे बस अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या या
सर्व स्रिया अष्टभुजाच नाहीत तर सहस्र
भुजाच आहेत नाही का?आपल्या सहस्रभुजांच्या सहाय्याने
या सर्व स्रिया बिनबोभाट पणे देश निर्माणाचे कार्य करीत
आहेत.
एवढेच काय? आपल्या घरात रात्रंदिवस राहणारी आपली
आई बहिण काकू मामी आत्या या सर्वार्थाने सहस्रभुजा आहेत.बिनतक्रार हजारो वर्ष त्या कुटुंब व राष्ट्र बांधणीचे
काम करीत नाहीत काय ? पण त्या आपल्या खिजगणतीतही
नसाव्यात हे ह्या अष्टभुजांचे केवढे दुर्भाग्य आहे !
स्री किती ही कर्तृत्ववान असली तरी ती कायम गृहित धरली
गेली वा तिचे वेळोवेळी खच्चीकरण व अवमुल्यन केले गेले.
नवरात्रीपुरता मातेचा गौरव थांबवून कायम तिची पुजा बांधली
गेली पाहिजे ही सुबुद्धी आम्हाला कधी येईल ती येवो.
धन्यवाद …(ही फक्त माझी मते आहेत)
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २८/०९/२०२२
वेळ : दुपारी १२: ५२