“ पालकांच्या परिश्रमाचे चीज करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने दर्जेदार शिक्षण घेऊन, स्वतः ला सिद्ध करून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करावी व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवावेत. इच्छा शक्तिला प्रयत्नांची जोड तुम्ही दिली तर यश निश्चितच मिळते” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक तथा दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष मान. पुष्कराज कोले यांनी येथील प्रथम वर्ष नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभा प्रसंगी ओघवत्या शैलीमध्ये स्व उदाहरणासह विद्यार्थीवर्गाला मौलिक मार्गदर्शन केले.
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या सेमिनार सभागृहात श्री पुष्कराज कोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजीराव शिंदे यांनी केले. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी ही जिल्ह्यातील एक नामांकित संस्था असून पदाधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामूळे दिवसेंदिवस संस्था तसेच महाविद्यालय प्रगतीचा आलेख उंचावत आहे. निरनिराळ्या दात्यांच्या सहकार्याने व पदाधिकाऱ्यांच्या पाठींब्याने हे महाविद्यालय प्रगती पथावर आम्ही नेऊ अशा निर्वाणीच्या शब्दात प्राचार्य डॉ. शिंदे यांनी आश्वासित केले. अकादमीचे उपाध्यक्ष व समारंभाचे प्रमुख पाहुणे मान. श्री प्रकाश जैतापकर यांनी शुभेच्छा देत असताना “विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्तप्रिय राहून आपले व आपल्या पालकांचेही नाव उज्वल करण्याचा” संदेश दिला. यावेळी श्री सिद्धी विनायक पुस्तक पेढी योजनेअंगर्गत मिळालेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कु. ग्रेसी पिंटो यांनी स्वागताची इंग्रजी कविता सादर केली. कु. वनिता गुरव यांनी इंग्रजी मधून आपले मनोगत व्यक्त केले. कु. निधी बागवे हिने महाविद्यालयाची महती सांगत नवोदित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाला संस्था पदाधिकारी, सौ. रीना सावंत, वेताळ बाम्बर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी श्री सुधाकर वळंजू, श्री.आपासाहेब गावडे,तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री गावडे यांनी केले. तर प्रा. मृणाली कुडतरकर यांनी इंग्रजीमध्ये उपस्थितांचे आभार मानले. समारंभाच्या वेळी मान.श्री.पुष्कराज कोले यांच्या कडून उत्कृष्ट मनोगते व्यक्त करणाऱ्या विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या व सर्व उपस्थितांना अल्पोपहार देवून सर्वांचा आनंद द्विगुणीत केला. समारंभाचे आयोजन द्वितीय आणि तृतीय वर्गांचे वर्ग प्रतिनिधी कु. अनिकेत शेलटे, कु. गौरी माने, कु. अनुजा सावंत, कु. साक्षी रावळ, कु. वैष्णवी परब, कु. मानसी नांदोसकर, कु. प्रगती वारंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी केले.