वेंगुर्ले
शिरोडा वेळागर समुद्रामध्ये आज सकाळी दोन पर्यटकांना बुडताना स्थानिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचविले. बुडणाऱ्या या दोन्ही पर्यटकांकडे प्रकाश भगत आणि दीपक पडवळ यांचे वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला.
शिरोडा वेळागर येथे आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश भगत सकाळी फिरण्यासाठी जात असताना समुद्राच्या पाण्यामध्ये दोन व्यक्ती बुडत असल्याचे त्यांनी पाहिले त्याच वेळी दीपक पडवळ यांनीही भगत यांना बुडणारे पर्यटक दाखवले. आंघोळ करताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुढे पुढे सरकत पुढे जात होते. दरम्यान भगत यांनी आपली तब्बेत बरी नसताना तात्काळ आजूबाजूला धाव घेत हाका मारत आपले भाऊ आणि शेजारी यांना बोलावले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे तसेच मदन अमरे, समीर भगत, सुधीर भगत, सुरज अमरे, आनंद अमरे, दीपक पडवळ, कोल्हापूर येथील अमोल, करण आदींनी समुद्रामध्ये धाव घेत बुडण्यापासून वाचवण्यासाठी दोरी, रिंग यांचा आधार घेत या सर्वांनी त्या बुडणाऱ्या दोन्ही पर्यटकांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काढले. ते दोन्ही पर्यटक किनाऱ्यावर आल्यावर घाबरल्याने ओळख न सांगता तिथून पळून गेले. मात्र ते घाबरले असल्याने त्यांना स्थानिकांनी जाऊ दिले.