सावंतवाडी
असनिये गावचे माजी सरपंच तथा श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन लाडू सावंत (५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित अकाली निधनाने सावंत कुटुंबीयांसह असनियेवासिय व त्यांच्या मित्र परिवाराला धक्काच बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळीच समजताच असनिये परिसरात शोककळा पसरली. सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत त्यांनी अनेक सोयी व सुविधा उपलब्ध करून गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा दिली. असनिये गावच्या मायनिंग विरोधी लढ्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. गावाच्या शैक्षणिक, क्रिडा, सामाजिक व धार्मिक विकासात ते नेहमी अग्रस्थानी असायचे. श्री वाघदेव उत्कर्ष कला व क्रिडा मंडळाचेही ते अध्यक्ष होते.
असनिये हायस्कूलच्या शिक्षिका जान्हवी सावंत यांचे ते पती, मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका गीता सावंत- मोर्ये यांचे ते भाऊ होत तर असनिये माजी सरपंच एम डी सावंत आणि प्रगतशील बागायतदार जनार्दन सावंत यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, एक बहीण, काका, काकी, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.