You are currently viewing शासनाची शेतकरी कर्ज माफी अद्याप न मिळाल्यामुळे महादेवाचे केरवडे सोसायटी समोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..

शासनाची शेतकरी कर्ज माफी अद्याप न मिळाल्यामुळे महादेवाचे केरवडे सोसायटी समोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..

निवेदन देऊनही शासनाने दखल न घेतल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच..

कुडाळ
तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थांनी शासनाची शेतकरी कर्जमाफी अद्याप न मिळाल्यामुळे दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक, कुडाळ प्रांत अधिकारी, कुडाळ तहसीलदार, कुडाळ पोलीस निरीक्षक, चेअरमन श्री सहकारी महादेवाचे केरवडे ग्रामस्वराज्य सहकारी सोसायटी मर्यादित केरवडे यांना निवेदन देऊनही शासनाने दखल न घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी वसंत दळवी, संभाजी निकम यांच्या सहित सुमारे ३० ग्रामस्थांचे आमरण उपोषण महादेवाचे केरवडे सोसायटी समोर आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील केरवडे, पुळास, निळेली, मोरे, चाफेली येथील शेतकऱ्यांकरिता केरवडे येथे श्री सहकारी महादेवाचे केरवडे ग्रामस्वराज्य सहकारी सोसायटी मर्यादित केरवडे सन १९६२ पासून कार्यरत आहे. सोसायटी स्थापनेपासून आजतगायत आम्ही पाच गावातील सुमारे २७५ शेतकरी सोसायटीचे सभासद असून गेली कित्येक वर्षे प्रत्येक सभासद सोसायटी मार्फत शेती कर्ज घेऊन शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. तसेच सभासदांपैकी मोठ्या प्रमाणातील शेतकरी हे दारिद्र रेषेखालील आहेत. राज्यात ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ निर्माण झाली, तेव्हा महाराष्ट्र शासनामार्फत शेतकरी कर्जमाफी दिलेली आहे. सन २०१७, २०१९ पूर्वी दोन वेळा कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा सहकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्हा सभासदांना कर्जमाफी मिळालेली आहे. परंतु २०१७ व २०१९ मध्ये राज्य सरकार मार्फत जाहीर झालेली कर्जमाफी आजतगायत आम्हा सभासदांना मिळालेली नाही.
सध्या जगावर कोरोना संसर्ग महामारी चे संकट व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न शून्य आहे. अशातच सोसायटीमार्फत कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांपुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. शासकीय कार्यालयात, बँकेत वेळोवेळी संपर्क साधला असता सदर सोसायटी कर्ज माफी निकषात बसत नाही, असे सांगितले जाते. यापूर्वी दोन वेळा कर्जमाफीचा लाभ मिळालेला असताना आत्ताच का कर्जमाफी आम्हाला मिळत नाही? जर सदर सोसायटी शासनाच्या कर्जमाफी निकषात बसत नसेल, तर आम्हा शेतकऱ्यांची शासन, जिल्हा प्रशासन, बँक आणि सोसायटीने फसवणूक करून अन्याय केलेला आहे. सदर फसवणूक व अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी आम्ही अन्यायग्रस्त कर्जमाफी पासून वंचित शेतकरी दि. १२ ऑक्टोबर २०२० पासून श्री सहकारी महादेवाचे केरवडे ग्रामस्वराज्य सहकारी सोसायटी मर्यादित केरवडे येथे कुटुंबासह आमरण उपोषणात बसत आहोत. उपोषणा वेळी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. असे उपोषणकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा