किमान सात दिवसांची मुदत देणे आवश्यक…
कणकवली
शहराची सुधारित विकास योजना तयार करण्याच्या अनुषंगाने आज बोलाविण्यात आलेली बैठक चुकीची आहे. किमान सात दिवस आधी या बैठकीबाबतची माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे. तशी मुदत देऊन सुधारित विकास योजना तयार करण्याबाबत पुन्हा बैठक लावावी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
श्री.उपरकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीकडून शहराचा सुधारीत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअनुषंगाने काल (ता.७) तातडीची जाहीर सूचना काढण्यात आली. तर त्याबाबतची प्रसिद्धी आज देण्यात आली. वस्तुत: शहराची सुधारीत विकास योजना तयार करायची असेल तर त्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. तसेच नागरिकांनाही काही सूचना करावयाच्या असतील तर त्यासाठी किमान काही दिवसांचा अवधी असायला हवा. पण नगरपंचायत प्रशासनाने या बैठकीबाबतचे पत्रक ७ सप्टेंबरला काढले आणि आज ८ सप्टेंबरला त्याबाबतची बैठक आयोजित केली.
श्री.उपरकर म्हणाले, शहर विकास नियोजनाबाबतची बैठक तातडीने लावण्यामागे या योजनेत घोळ घालण्याचा प्रयत्न असावा अशीही शक्यता आहे. तातडीची बैठक आयोजित करून काही सोईचे भाग वगळायचे आणि काही भाग नव्याने समावेश करायचे असाही यामागे प्रयत्न असू शकतो. सध्या गणेशोत्सव सणाची धामधूम आहे. त्यामुळे एका दिवसांत बैठक आयोजित करून निव्वळ सोपस्कार पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आजची बैठक रद्द करून सात दिवसानंतर पुन्हा ही बैठक लावावी जेणे करून नागरिकांना आपल्या सूचना आणि अभिप्राय मांडता येतील अशी मागणी श्री.उपरकर यांनी केली आहे.