लालित्य नक्षत्रवेल सहित अनेक साहित्य समूहांवर शोककळा
लालित्य नक्षत्रवेल समूह प्रमुख लेखक, कवी श्रीकांत दीक्षित यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले काही दिवस ते लेखनापासूनही अलिप्त होते. फोर्स मोटर्स, पुणे येथे सर्व्हीस मॅनेजर या पदावर कार्यरत असूनही त्यांनी लेख, कथा, ललित, काव्यलेखन असे छंद जोपासले होते. २०१९ मध्ये त्यांना “काव्यस्तंभ” व २०२० मध्ये “काव्यरत्न” असे पुरस्कार मिळाले होते. ऑनलाईन अनेक स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ पासून सर्वोत्कृष्ट मानपत्र मिळाली होती. श्रीकांतदादा म्हणजे एक अजब रसायन….! साहित्य निर्मितीसाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे. नक्षत्रवेल समूहाच्या माध्यमातून त्यांनी सहा प्रातिनिधिक पुस्तके ऑनलाइन प्रसिद्ध केली होती तर अलीकडेच पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते त्यांनी प्रातिनिधिक “शब्दगंध” हा कथासंग्रह पुणे येथून प्रकाशित केला होता. अनेक वृत्तपत्रे, मासिक, स्टोरीमिरर, शोपिझेन, प्रतिलिपी येथे ऑनलाईन साहित्य प्रकाशित केले आहे. लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या माध्यमातून ते नवोदितांना नेहमीच मार्गदर्शन करायचे.
ललित लेखनात हातखंडा असणारे श्रीकांतदादा काव्यरचना देखील अतिशय सुरेख लिहायचे. त्यांच्या लेखनास दाद द्यावी तेवढी कमीच. विपुल शब्द संपदेने शब्दवेध घेणाऱ्या श्रीकांतदादांच्या प्रत्येक लेखातून नवनवीन शब्दांची ओळख व्हायची. दादांचे लेखन म्हणजे काय वाचावे आणि किती वाचावे? असा प्रश्न पडायचा. “कधी तू” हा त्यांचा ललीतबंध २०२१ मध्ये प्रकाशित झाला होता. *”कधी तू”* हा श्रीकांत दादांचा ललित बंध म्हणजे जीवाला जीव लावणारा…श्वासांची ओंजळ घेऊन प्रीतीची साक्ष देणारा…”येईन मी आता घेईन कवेत तुला” असे आश्वासन देणाऱ्या…त्यांच्या “कधी तू” या ललित बंधातून शब्दशिल्परुपी हिरे, माणिक, मोती यांचा किती संग्रह होता हे दिसून येते.
श्रीकांतदादा अत्यंत मनमिळावू आणि दिलदार स्वभावाचे असल्याने साहित्य क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. अनेकांच्या मनाला श्रीकांतदादांचे अकाली जाणे चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने दीक्षित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर लालित्य नक्षत्रवेल साहित्य समूह पोरका झाला असून समूहाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.