महिलांचे कायदेविषयक सशक्तिकरण’ कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग प्रतिनिधी:
महिला आयोग (NCW) च्या सहकार्याने आठ राज्यातील महिलांसाठी कायदेशीर जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई म्हणजे मालसा (MLSA) यांच्या निर्देशानुसार मा. जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या मार्फत रविवारी 11 ऑक्टोबर 2020 रोजी महिलांना कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संस्था, एमआयडीसी कुडाळ येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची रूपरेषा NALSA यांचे गीताने झाली. प्रस्तावना मा. श्री. डी. बी. म्हालटकर, सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री. एस. व्ही. हांडे यांनी महिला सबलीकरण व सक्षमीकरण हा योग साधण्याचा.. दुग्धशर्करा योग आहे. कष्ट व मेहनत यासाठी कोकणी माणूस व महिला कधीही कमी पडत नाहीत. माता सावित्रीबाईंच्या प्रयत्नांची जाणीव करुन देणे हेच आजच्या काळात महिलांचे सबलीकरण आहे. आजच्या काळात जवळजवळ ८० टक्के महिला सुशिक्षित आहेत. महिला पुरुषांपेक्षा कांकणभर सरस असतात. महिलांना आपल्या मधील सुप्त शक्तीची जाणीव करून घेणे गरजेचे आहे. कायदे म्हणजे नवचंडीच्या हातात असणारी अस्त्रे आणि शस्त्रे आहेत. अत्याचार झालेल्या व्यक्तीला मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे मानसिक परिवर्तन झाले पाहिजे. असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री. एस. हांडे यांनी व्यक्त केले. सदरहू कार्यक्रम मा.श्री.एस. बी. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कुडाळ यांचे मार्गदर्शन व आयोजनाने करणेत आला.
कार्यक्रमास कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी वक्त्यांचा सहभाग होता…’महिला व राज्यघटना’ या विषयावर श्रीमती वेदिका विवेकानंद नाखरे (प्राध्यापिका, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज) यांनी उत्कृष्ट माहिती दिली. नालसा प्रशिक्षित तज्ञ अॅड. श्रीमती निकिता नितीन म्हापणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोग, विधि सेवा प्राधिकरण यांचेकडील महिलांच्या तक्रारी संदर्भातील भूमिका, कौटुंबिक कायदा, दिवाणी व फौजदारी कायदा, महिला आणि जनन आरोग्य हक्क यावर उत्तम माहिती दिली. कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमोल सुरेश सामंत यांनी कामगार कायदा याविषयी उत्कृष्ट माहिती दिली.
कार्यक्रमात उपस्थित सहभागी सर्व महिला प्रतिनीधीचे स्वागत… सौ.अडुळकर व.लि. दिवाणी न्यायालय कुडाळ यानी गुलाब पुष्प देऊन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. पी. पी. मालकर, न्यायालयीन व्यवस्थापक, जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग-ओरोस यांनी केले. आभार मा.श्री.एम. बी. पाटील, दिवाणी न्यायाधीश व प्रथम न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांनी मानले.
या कार्यक्रमास दिवाणी न्यायालय कुडाळ चे सहायक अधीक्षक व संबंधित कर्मचारीवर्ग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ओरोस येथील अधीक्षक व संबंधित कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोखीम मुल्यांकनाची कर्तव्यदक्षता व जबाबदारी घेवून कार्य करीत असणा-या कुडाळ येथील सर्व महिला वर्ग ..तालुका कार्यालय… गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील आशा स्वयंसेविका, तालुका आरोग्य अधिकारी , प्रभाग समन्वयक (NRHM), महिला पोलिस दक्षता समिती, कुडाळ व कणकवली विभाग येथील महिला समुपदेशन समिती येथील महिला अधिकारी व सदस्य सहभागी झाल्या होत्या.