शाळा बंदचे पडसाद गणेश भक्तांच्या सजावटीतूनही दिसू लागले..
कोरोनाच्या काळात सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहे या ऑनलाईन शाळेत मात्र मुलं काही रमताना दिसत नाहीत. या मुलांच्या मनात अनेक भावना दाटून राहिलेले आहेत. देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी विघ्नहर्त्यालाच शिक्षक बनून विघ्नहर्त्याची शाळा आपल्या सजावटीतून साकारली आहे.
नेहमीच नावीन्यपूर्ण कलाकृती जोपासणाऱ्या चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीतून ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आपल्या या देखाव्यातून अचूक टिपले आहेत.बाप्पा! आपल्या सवंगड्यांना घेऊन शाळेत गेल्यावर जे प्रश्न पडतात ते अक्षयने अतिशय कल्पकतेने देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न आहे.
आज कोरोनाच्या महामारीत सर्वकाही ठप्प झालेले आहे. शासनाने ऑनलाईन शाळा सुरू केल्या मात्र, ज्या ठिकाणी मोबाईलला साधी रेंज मिळत नाही त्या ठिकाणी आॅनलाईन शिक्षणाचा काय बोजवारा उडत असेल विचार करायला नको!
या कल्पने विषयी बोलताना अक्षय मेस्त्री म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही आमच्या बापाच्या दर्शनाला येताना भाविकांना शालेय साहित्य देण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी जमा झालेल्या रक्कमेतून काही घरगुती साहित्य घेऊन ते अनाथाश्रम दिले आणि जमा झालेलं शैक्षणिक साहित्य विविध शाळेतील मुलांना मोफत वाटप केले होते.
यावर्षी अजून एक कल्पना या निमित्ताने मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष बदलले… इयत्ता बदली! पण, कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थी आजपर्यंत शाळेत जावू शकला नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आमची इयत्ता बदलली? पुस्तके बदलली ? पण, आमची शाळा कधी सुरू होणार ? हा भावनिक प्रश्न या सजावटीतून मांडण्याचा अक्षय मेस्त्री यांनी प्रयत्न केला आहे. या देखाव्यात प्रत्यक्षात बुद्धीची देवता गजानन शिक्षक बनले असून उंदराच्या रूपाने विद्यार्थी हातात पाटी घेऊन आमच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान समाजशास्त्र, कला, क्रीडा या विषयांचे काय? असा सवाल करीत विद्यार्थी रुपीउंदीर प्रत्यक्ष विघ्नहर्त्यासमोर उभे राहून प्रश्र्न विचारतात… हा भावनिक देखावा बरच काही सांगून जात असुन या परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.