कणकवली
कणकवली पोलीसांकडून गणेश चतुर्थी निमित्त पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्यात आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याला 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामुळे भविष्यात अशाच पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पोलीस खाते करत राहील असे हुंदळेकर यांनी सांगितले.
गणेश चतुर्थी निमित्त पहिल्यांदाच कणकवली पोलीस ठाण्यात पोलिसांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, डॉ. अमित आवळे, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक बर्गे पोलीस हवालदार सावंत, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे आदि उपस्थित होते.