विरोधकांना योग्य वेळी देणार कायदेशीर उत्तर
नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
नवीन कुर्ली विकास समिती चा मागील 13 वर्षे मी अध्यक्ष असून नवीन कुर्ली वसाहतच्या नळपाणी योजनेच्या मेंटेनन्स साठी मागील 12 वर्षांत मी पदरमोड करून 20 लाखहुन अधिक रक्कम खर्च करत गावातील घरोघरी पाणीपुरवठा सुरळीत राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. जलसंपदा विभागाकडून केवळ नळपाणी कामगारांचा पगार मिळत होता. घरपोच पाणीपुरवठा सुरळीत राहून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये ही माझी भूमिका त्यामागे होती. त्यामुळेच नवीन कुर्ली वसाहतीमधून आम्हाला वाढता पाठींबा मिळत असल्याने पोटशूळ उठलेल्या विघ्नसंतोषी वृत्तीने आमची नाहक बदनामी करण्याचे कुटील राजकारण केले जात असल्याचे नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की कृष्णा परब यांच्याशी झालेल्या बाचाबाचीत नळपाणी योजनेच्या भरलेल्या डिपॉझिट चा मुद्दाच आला नव्हता. हे सर्व अमच्याविरुद्ध रचलेले राजकीय कुभांड आहे. नवीन कुर्ली वसाहती साठी अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. मूलभूत गरज म्हणून जलसंपदा विभागाकडून नळपाणी योजना बजविण्यात आली.परंतु त्याच्या मेंटेनन्स साठी निधी दिला नाही. मंडळाचा अध्यक्ष या नात्याने गावातील माझ्या ग्रामस्थांना झळ पोचू नये म्हणून मी स्वतः आजवर 20 लाखहुन अधिक पदरमोड करून घरोघरी पाणीपुरवठा चालू ठेवला. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून नवीन कुर्ली वसाहत नळपाणी योजनेच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणसाठी निधीही मंजूर करून घेतला असून लवकरच त्या कामाचा शुभारंभ होईल. केवळ 3 वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने 65 % रक्कम भरून शेतजमीन मिळवून देतो असे सांगत देवघर धरणग्रस्तांकडून प्रत्येकी 15 हजार वर्गणी गोळा केली. 15 हजार रक्कम देण्यासाठी मुंबईस्थित धरणग्रस्तांना सोशल मीडियावर आवाहन करत लाखोंचा निधी जमा केला. शेतजमीन साठी शासनाविरोधात केलेली केस फेटाळून लावल्याने हा लाखो रुपयांचा गोळा केलेला निधी वाया गेला. आपले बिंग फुटणार म्हणून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करून 15 हजार वर्गणी दिलेल्या 63 धरणग्रस्तांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली. ह्या उपोषणासाठीही लाखो रुपयांच्या वर्गणीचा भुर्दंड धरणग्रस्तांच्या माथी मारला. उपोषण करताना केलेल्या मागण्यांना कुठलाच आधार नसल्यामुळे ह्या उपोषणाला निल्हाधिकाऱ्यांनी कवडीची किंमत दिली नाही. त्यामुळे सैरभैर झालेल्या ह्या नव्याने स्थापन झालेल्या मंडळाकडून स्वतःचे अपयश लपविण्यासाठी आमची नाहक बदनामी करून गैरसमज पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांच्या ह्या राजकीय कपट कारस्थानाना योग्य वेळी कायदेशीर उत्तर देणार असल्याचा इशाराही पिळणकर यांनी दिला आहे.