*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. महाराष्ट्र रणरागिणी साहित्य कुंज सदस्या लेखिका कवयित्री किरण (करामोरे) चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*किती सजवावे तुजला,आला सोनियाचा दिन*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*आली आली ग गौराई सजले सुंदर घरदार*
*तुझ्या दिव्य तेजाने घराचे जाहले मंदिर*
*साज चढविला,कशी दिसते रूपवान*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*हिरवा चुडा हाती,नथ सजविली नाकात*
*भरजरीची साडीचोळी,मंगळसूत्र शोभे गळ्यात*
*गोरी गोमटी गौराई,उभी शिवासाठी सजून*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*आनंदाने तुजसाठी बनविते पुरणपोळी*
*करंज्या,लाडू,चकल्या साखरेची साटोळी*
*केळीच्या पानावर पाळी ठेविल्या सजवून*
**अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*पंचपक्वान बनविले आज तुजसाठी गौराई*
*लावते नैवेद्याचे भोग,भोजन रुचकर होई!*
*पुण्यवान मज वाटे,गाव करते भोजन*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*आरती गाऊन,जानव्यात गाठी गुंफती सुवासिनी*
*गौराईच्या माना हलविता,उभ्या चेहरा उतरवुनी*
*झिम्मा फुगडी खेळून गायले महालक्ष्मी भजन*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*दे जाता आशीर्वाद, सुखसमृद्धीचा प्रसाद*
*संकटी रक्षावे,भक्ताची ऐकावी साद*
*चूक माफ करावी,मज दास समजून*
*अडीच दिवसाची तू ग माहेरवाशीण*
*👉सौ किरण महादेव चौधरी*
*गडचिरोली*