You are currently viewing सावंतवाडीचे नवे पोलीस निरीक्षक तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालणार काय ?

सावंतवाडीचे नवे पोलीस निरीक्षक तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालणार काय ?

*सातार्डा,आरोंदा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत मटका, गोवा बनावटीच्या दारूचे धंदे तेजीत.*

 

*बचत गटाच्या महिलेने संवाद मिडियाकडे मांडली कैफियत*

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहर परिसर आणि तालुक्यात मटका, दारू आणि जुगार सारखे अवैद्य धंदे फोफावले आहेत. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर महादेव कोरे यांची तडकाफडकी सावंतवाडीतून जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नवीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पो.नि. फुलचंद मेंगडे यांची पोलीस दलात वचक असल्याने सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील अवैद्य धंद्यांना आळा बसणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सावंतवाडी शहरात अवैद्य दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे, खाजगीत बोलताना काही पत्रकार तर खाकी वर्दीवाले काही शुक्राचार्य सुद्धा गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय करतात असे सांगतात. गोव्यातून येणारी करमुक्त गोवा बनावटीची अवैद्य दारू सर्वप्रथम सावंतवाडी तालुक्यात येते आणि तिथून खाकीच्या आशीर्वादाने इतरत्र वितरित होते, किंवा गाड्या पास होतात. त्यामुळे सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये तडफदार अधिकारी असणे आवश्यक आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून शंकर कोरे यांची तडकाफडकी बदली होऊन त्यांच्या जागी फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती हे समीकरण जुळून आले तर नक्कीच अवैद्य धंद्यांना आळा बसणार अशी आशा ना. दीपक केसरकर आणि पो.नि. मेंगडे यांच्याकडून सावंतवाडीवासिय करत आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा आणि आरोंदा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे सुरू झाले असून मटक्याचा व्यवसाय देखील तेजीत सुरू आहे. सातार्डा पोलीस दूरक्षेत्राच्या समोरच क्लब च्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरू आहे. परंतु पोलिसांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो. सातार्डा, कोंडुरा, मळेवाड, आरोंदा येथे मटक्याचा व्यवसाय गणेश चतुर्थीच्या सणाच्या दिवसातही जोरदार सुरू आहे. गोव्याची स्वस्त दारू आणि मटक्या मुळे बचतगट आदींच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचे रोजंदारीवर काम करणारे नवरे मटका खेळतात आणि दारू पिऊन बरबाद होतात, त्यामुळे अनेकांचे संसार दारू आणि मटक्यामुळे उध्वस्त झाल्याचे गाऱ्हाणे बचत गटाच्या महिलेने संवाद मीडियाच्या प्रतिनिधिकडे मांडले आहे.

गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी काही गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून घर बसल्या व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात आणि घर चालवतात. परंतु अशावेळी घरातील पैशांवर नवरे तिठ्यावर, बाजारपेठेत जाऊन मटका खेळतात, दारू ढोसून येतात त्यामुळे अनेकांचे संसार वाऱ्यावर पडले आहेत. बायको कमावते आणि नवरे दारू ढोसून, मटक्यामध्ये पैसे घालवतात असा विरोधाभास पहावयास मिळतो. सावंतवाडीचे ना.दीपक केसरकर बचत गटाच्या माध्यमातून मतदारसंघातील महिलांना घर बसल्या रोजगार कसा उपलब्ध होईल?, त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता कशी येईल? यासाठी प्लॅनिंग करत असतात तर दुसरीकडे खाकीच्या आशीर्वादावर मटका, दारू, जुगार सारखे अवैद्य व्यवसाय तालुक्यात जोरदार सुरु आहेत.

कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक नेते अशी ओळख असणारे ना. दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद असल्याने मतदारसंघातील लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तालुक्यात सुरू असणारे गोवा बनावटीच्या दारूचे अवैद्य व्यवसाय, टपऱ्यांवरील मटक्याचे, जुगाराचे अवैध धंदे तात्काळ बंद होऊन बरबाद होणारी पिढी आणि लोकांचे संसार वाचतील अशी अपेक्षा केली जात आहे. नवे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी अवैद्य धंद्यांना आळा घालावा व ना.केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुका अवैध धंदेमुक्त व्हावा अशी आशा अपेक्षा केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा