You are currently viewing महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुजरात सरकारच्या “त्या” निर्णयाचा निषेध

महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुजरात सरकारच्या “त्या” निर्णयाचा निषेध

भाजप भगावो, बेटी बचाव दिल्या घोषणा

सावंतवाडी

गुजरात येथील बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील ११ ही आरोपींना गुजरात सरकारने सुटका केल्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “भाजप भगावो, बेटी बचाव ” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, २००२ मध्ये गुजरात येथे झालेल्या नरसंहार मध्ये बिल्कीस बानो वर ११ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीचा निर्दयी खून करण्यात आला होता. तसेच तिचे पूर्ण कुटुंब संपविण्यात आले होते. परंतु, बिल्कीस बानो यांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिल्यानंतर त्या ११ ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, गुजरात सरकारने त्या ११ ही आरोपींना नियमबाह्य रित्या सुटका केली. या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या असून त्यांनी आज केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला आहे.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक चित्रा बाबर देसाई, हिदायत्तुला खान, देवा टेमकर, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, अफरोज राजगुरू, सावली पाटकर, पूजा दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा