गुजरात सरकारच्या निर्णयाबाबत व्यक्त केला निषेध
कणकवली
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडल्याप्रकरणी कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत निदर्शने केली.यावेळी कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे म्हटले आहे की, गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देश- जगभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. बिल्किस बानो यांनीदेखील “आपल्यावर लैंगिक अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या ११ दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या दिवशी आम्ही सर्वांनी आमचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची आणि अभिमान बाळगण्याची अपेक्षा होती, त्याच दिवशी देशातील महिलांना बलात्कारी आणि हत्या करणाऱ्यांची सुटका होताना पाहावं लागलं हे खूप लाजिरवाणं आहे. दोषींची शिक्षा माफ करणं केवळ अनैतिक आणि बेकायदेशीरच नाही, तर ते गुजरात राज्याच्या आपल्याच विद्यमान माफी धोरणाचे आणि केंद्र सरकारने राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करतं, असे कायदेतद्यांचे मत आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने या ११ आरोपींना २१ जानेवारी २००८ रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांची ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. कैदेत असताना या दोषींना अनेकदा पॅरोलवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले. त्यांचा धंदा तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये या दोषींचा सहभाग असल्याच्या देखील बातम्या आल्या.
अशाप्रकारे बलात्कारी, खुनी लोकांची सुटका करणं अन्याय असून न्यायाशी प्रतारणा करणे आहे. देशभर सामान्य नागरिक, तळागाळात काम करणारे कर्मचारी, मानवाधिकार कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक, इतिहासकार, विद्वान, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार आणि माजी नोकरशहा या निर्णयाचा निषेध करत आहेत. हा अमानवीय निर्णय परत मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल झालेली आहे. या सुटकेच्या निषेधार्थ आम्ही जिल्ह्यातील नागरिक शुक्रवार दि. २६/०८/२०२२ रोजी ११. वा. प्रांत कार्यालय कणकवली समोर निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोपी मोकट सुटल्यास कोणालाच कायद्याचा धाक उरणार नाही त्यामूळे समाजात गुन्हेगारी वाढेल. म्हणून आरौपीना लवकरात लवकर पुन्हा अटक व्हावी.
आमची ही मागणी आपण केंद्र सरकार पर्यंत पोहचवावी ही विनंति. दरम्यान या निदर्शने आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, अर्पिता मुंबरकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, कणकवलीचे नगरसेवक कन्हैया पारकर आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.