You are currently viewing तळेरेतील मॉडेल कॉलेजचं राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन

तळेरेतील मॉडेल कॉलेजचं राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन

वेंगुर्ला येथील सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचं देखील राज्यपाल करणार भूमिपूजन

तळेरे: प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यातील तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी मॉडेल कॉलेजचे उद्घाटन आणि वेंगुर्ला येथील सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचं भूमिपूजन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपपरिसरचे प्रभारी संचालक प्रा श्रीपाद वेलींग यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसरात अंतर्गत येणार हे कॉलेज मुंबई विद्यापीठाचं मॉडेल कॉलेज म्हणून प्रसिद्ध असणार आहे. राज्यपालांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार असून हे कॉलेज विद्यापीठातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होणार आहे. तर सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचं भूमिपूजन दुपारी 3 वाजता वेंगुर्ला येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरू प्रा रविंद्र कुलकर्णी, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे, वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ विनोद पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. तळेरे येथील कार्यक्रम विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात होणार आहे. तर वेंगुर्ला येथील कार्यक्रम मधुसूदन कालेलकर बहुद्देशीय सभागृहासमोर होणार असल्याची माहिती प्रा श्रीपाद वेलींग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा