You are currently viewing सैनिकांच्या शौर्याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिल्यास पुढील पिढीला प्रेरणा मिळेल – सुधीर सावंत

सैनिकांच्या शौर्याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिल्यास पुढील पिढीला प्रेरणा मिळेल – सुधीर सावंत

वेंगुर्लेत प्राथमिक शिक्षक समिती तर्फे सैनिकांचा सन्मान…

वेंगुर्ले

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवण्याचे खऱ्या अर्थाने काम सैनिकांनी केले. अशा सैनिकांच्या मुलाखती घेवून त्यांचे अनुभव लिखित करून त्यांचे पुस्तक छापणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक समित्यांनी पुढाकार घ्यावा. सैनिकांच्या शौर्याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिली पाहिजेत जेणेकरून पुढील पिढी यातून प्रेरणा घेईल असे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ले तर्फे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यातील आजी, माजी सैनिकांचा सन्मान सोहळा येथील साई डिलक्स हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळयात वेंगुर्ले तालुक्यातील सुमारे ९० आजी, माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य समितीचे सल्लागार भाई चव्हाण, शिक्षक पतपेढीचे चेअरमन आनंद पेडणेकर, वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गावडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, समितीचे जिल्हा सरचिटणिस सचिन मदने, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, शिक्षक पतपेढी अध्यक्ष तथा राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य महिला आघाडी सल्लागार सुरेखा कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समिर जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले. यावेळी भारत माता व भा. वा. शिंपी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील ९० आजी माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काहि माजी सैनिकांनी आपले अनुभव कथन केले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या दाभोली शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहागीत सादर करून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नाईक व नेहा गावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, पतपेढी संचालक त्रिंबक आजगावकर, स्वामी सावंत, संतोष परब, महिला आघाडी तालुकाध्यक्षा लीना नाईक, विश्वनाथ जांभवडेकर, रेश्मा मराठे, तुळशीदास पाटकर, तन्वी पाटकर, प्रतिभा पेडणेकर, कालिदास खानोलकर, विनोद मेथर, किरण मुडशी, प्रकाश भोई, सुदर्म गिरप यांच्यासहित सर्व वेंगुर्ला शिक्षक समिती तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्या यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा