देवस्थानाच्या वादातून मंदिरात मीटिंग घेवून बहिष्काराच घालण्याचा प्रकार
कुडाळ पोलीस आणि तहसीलदार यांना दिले निवेदन
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात दोन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. गावातील थळकर आणि दलित समाजातील कदम या दोन कुटुंबांवर हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बहिष्कारात गावचे सरपंच आणि उपसरपंच आणि देवस्थानातील काही मानकर यांनी हा जातपंचायती सारखी मीटिंग बोलावून,देवतेची भीती घालून बहिष्कार टाकला आहे. बहिष्कृत केलेल्या कुटुंबातील एका वृद्धीचे नुकतेच निधन झाले.तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा जाण्यास गावातील लोकांना बंदी करण्यात आला. त्यामुळे मृतदेह तब्बल बारा तास घरातच ठेवावा लागला होता.त्यानंतर पाहुण्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.या बहिष्काराची लेखी तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात, कुडाळ तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कुडाळ येथे दोन्ही बहिष्कृत केलेल्या कुटुंबांनी केली आहे.
भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, शिवापूर गावात मात्र जातपंचायत बसून बहिष्कार घालण्याचे काम सुरू आहे. ११ ऑगस्ट रोजी गावातील सर्व जनतेची मीटिंग श्री देव रवळनाथाच्या मंदिरात बोलवून त्या ठिकाणी देवतेची शपथ घालून, देवस्थानात (थळकर) असलेल्या राऊळ कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णया प्रमाणे देवस्थानात दांडेकर म्हणून मानकरी असलेल्या दलित समाजातील कदम कुटुंबावरही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गावातील दोन्ही दुकानांवरून कदम कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देण्यास मनाई करण्यात आली. तर या दलित कुटुंबातील कोणाही सदस्याला घरी घ्यायचे नाही. बोला चाली करायची नाही.कोणताही व्यवहार करायचा नाही अशी सक्त बंदी जारी केली व बहिष्कार जो व्यक्ती मोडेल त्याला दंड केला जाईल अशी मंदिरातच बजावणी केली. त्याच रात्री पार्वती दत्ताराम राऊळ या थळकर कुटुंबातील महिलेचे निधन झाले. हे निधन झाल्याची वार्ता कळवल्यानंतर सुद्धा गावातून एकही व्यक्ती त्या घरी आलेला नाही. बंदी असल्यामुळे आणि तुम्हाला बहिष्कृत केलेले असल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. असे जबाबदार मानकरयांनी सांगितले.तर अनेक महिला आणि वृद्धाने तुमच्यावर बहिष्कार असल्यामुळे येऊ शकत नाही असे सांगितले. दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत कोणी लोक थळकर कुटुंबाच्या मयत झालेल्या व्यक्तीच्या घरी आलेले नाही. अखेर दूरवरून आलेले पाहुणे आणि त्या घरातील असलेले पुरुष अशा एकूण नऊ लोकांनी मयत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात अशा प्रकारची घटना होणे हा निंदनीय प्रकार असल्याने या बहिष्कार करणारे जे लोक आहेत त्यांचे वर कडक कारवाई व्हावी अशी मागणी थळकर आणि दांडेकर कुटुंबाने केली आहे.
दरम्यान या कुटुंबाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री देव रवळनाथ मंदिर येथे देवाच्या कामकाजा वरुन व मानपाना वरून देवस्थानामध्ये वाद – विवाद चालू आहेत . गावातील कुळकर घराण्याचे श्री सिताराम नारायण राऊळ व आनंद देऊ राऊळ यांनी देवळातील कामकाजावरून थळकर घराण्यातील प्रकाश लाडू राऊळ व आम्हाला , दसरा , शिमगा व गुढीपाढवा या तिन्ही उत्सवांना वरील दोन्ही इसमानी पुर्वपार चालत आलेली आमची परंपरा व श्री देव रवळनाथाच्या पूजा अर्चा करण्यास विरोध केला . नंतर आम्ही थळकर कुटुंबाने श्री गणु लक्ष्मण राऊळ यांना सदर बाबीची मंदिरातच पुर्व सुचना दिली . त्यानंतर श्री प्रमोद गोविंद राऊळ , सिताराम नारायण राऊळ , यशवंत शंकर कदम ( सरपंच ) , मंगेश सोमा कदम , मनोज दिनेश राऊळ ( उपसरपंच ) या सर्वांनी संपूर्ण गावाला वेटिस धरून श्री देव रळनाथ मंदिरामध्ये गावाची बैठक घेऊन.गावातील इतर रयत,पिल्गी यांना देवाची भिती दाखवून थळकर कुटुंबावर बहिष्कार घातला . त्यात थळकर लोकांकडे जाण्या – येण्यास बंदी घातली तसेच दुकान गिरण , कामा – धंदयास जाण्यास बंदी केली.त्याच दिवशी आमच्या घराण्यातील पार्वती दत्ताराम राऊळ ही मयत झाली असता त्या पाचही इसमांनी प्रेतास येण्यास बंदी घातली. तरी अशा प्रसंगाच्या वेळी गावातील पालकर , पाटकर , बोभाटे हे आमचे पाहुणे त्यांनाही मंदीरामध्ये बोलावून वारंवार बैठका घेवून देवाची भिती दाखवून आमच्याकडे येण्यास बहिष्कार केला.
तसेच गावातील दलित समाजातील दांडेकर कुटुंबावरही गावात फिरण्यास व दुकान, गिरण यावर जाण्यास बंदी घातली . त्याच उदाहरण- श्री . राजेंद्र बाबाजी घाडी यचि परि जनरल स्टोअर्सर व श्री तुकाराम शंकर राऊळ या दोन्ही दुकानांवर श्री शांताराम दत्ताराम कदम व श्री . भागोजी सखाराम कदम हे दुकानावर गेले असता या दोन्ही दुकानदारांनी दुकानातील माल देण्यास नकार दिला.आणि तुमच्यावर बंदी असल्यामुळे आम्ही तुम्हाला दुकानातील काही देणार नाही. तरी अशा एकमेकांकडे जाण्यासाठी बंदी असल्यामुळे गावात वितंड वादास चालना मिळत आहे. जातीय सलोखा संपत चालला आहे. दोन्ही कुटुंबातील स्त्रिया, वृद्ध भीतीच्या छायेत आहेत. त्यांना संरक्षणाची गरज आहे. असे निवेदनात या कुटुंबाने म्हटले आहे.