*आजगाव साहित्य कट्ट्याची बाविसावी सभा संपन्न*
(विनय सौदागर यांचा काव्यभोवताल)
‘मालवणी भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण व्हावं. ही भाषा सर्वव्यापी व्हावी आणि तिने ज्ञानपीठाला गवसणी घालावी’ ,असा आशावाद कवी विनय सौदागर यानी व्यक्त केला. ते आजगाव वाचनालयातील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या बावीसाव्या सभेत बोलत होते.
‘काव्यभोवताल’ कार्यक्रमांतर्गत त्यानी आपल्या मालवणी कवितेचा प्रवास उलगडून दाखवला. ‘मी सहा वर्षांपूर्वी एका स्पर्धेकरीता पहिली मालवणी कविता लिहिली. नंतर वृत्तपत्रातील सदरामध्ये कविता लिहू लागलो. पुढे सोशल मिडीयातही प्रतिसाद मिळू लागला अन् त्यातून ‘भोवताल’ व ‘सभोवताल ‘ असे दोन काव्यसंग्रह निर्माण झाले. वृत्तपत्राच्याच सहकार्यातून चारोळ्या लिहिल्या. एकंदरीत माझ्या काव्यप्रवासात वृत्तपत्र व पत्रकारांचा वाटा फार मोठा आहे. ‘ असेही त्यानी नमूद केले.
शेवटी ते म्हणाले की,’ ज्या मालवणी कवितेने मला आनंद दिला,नाव दिले ;त्या मालवणी भाषेत चांगले साहित्य निर्माण व्हावे,यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहेन. ‘ कार्यक्रमात कवी सौदागर यानी ‘रंग मुलखाचे’, ‘बारा म्हयन्याचे बारा तर्हा’, ‘चार दिसाची चार’, ‘थकललो मालवणी माणूस’, ‘ मराण’ आणि ‘औसार कडकडलो’ या कविताही सादर केल्या.
प्रास्ताविक विनायक उमर्ये यानी केले, तर ईश्वर थडके, सोमा गावडे व स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी चर्चेत भाग घेतला. प्रकाश कब्रे यानी मालवणीतील काही किस्से सांगितले, तर अनिल निखार्गे यांनी ‘मालवणी भाषेला लिपी नाही,ही उणीव’ हे एका ज्येष्ठ लेखकाचे मत लक्षात आणून दिले.
सभेला रामचंद्र झाटये,विशाल उगवेकर, दत्तगुरू कांबळी, उत्तम भागीत, प्रशांत रेगे, प्रकाश मिशाळ ,एकनाथ शेटकर, प्रिया आजगावकर, अनिता सौदागर, मीरा आपटे,सरोज रेडकर आणि रश्मी आजगावकर आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते.