You are currently viewing “वेंगुर्ला जवळील “घेतो रे” गावातील जुगाराची बैठक आज पुन्हा नव्याने बसली भूत बंगल्यात

“वेंगुर्ला जवळील “घेतो रे” गावातील जुगाराची बैठक आज पुन्हा नव्याने बसली भूत बंगल्यात

*संवाद मीडियाच्या बातमीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली होती गंभीर दखल*

 

वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला लगतच्याच “घेतो रे” गावातील भूत बंगला येथे काल संध्याकाळी जुगाराची मैफिल बसल्याची आणि ती मैफिल पहाटेपर्यंत चालणार असल्याची खात्रीलायक बातमी संवाद मीडियाने दिली होती. संवाद मीडियाच्या बातमीची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आणि संवादने दिलेल्या लोकेशनवर तपास करण्याचे आदेश दिले.

सदर भागातील खाकीचे अंमलदार असलेले नेताजी ढालकर यांनी त्या जागेचा पंचनामा केला आणि तशाप्रकारे कोणतीही बैठक बसली नसल्याचा अहवाल दिला. त्या गावातील भूत बंगल्यात बसलेली बैठक पहाटे ४.०० वाजता आटोपली होती. परंतु तिथे काहीही घडलं नसल्याचं दाखविण्यात आलं. स्थानिक अंमलदार नेताजी ढालकर यांच्या कृपाशीर्वादाने आज पुन्हा भूत बंगल्यात जुगाराची बैठक बसली असून दिवसाकाठी २०००/- रुपये हफ्ता घेऊन स्थानिक अंमलदार बैठक बसवतात व याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असतात.

“घेतो रे” येथील ज्या भूत बंगल्यात बैठक बसते तो बंगला कोल्हापूर येथील मयत असलेल्या विमा अधिकाऱ्याचा असल्याने तो बंगला भूत बंगला म्हणून ओळखला जातो. काल बैठक सुरू असताना “छम छम” असा आवाज आल्याचा भास एका जुगारी खेळीला झाल्याने त्याने मैफिलीतून काढता पाय घेतल्याचे समजते. चर्चेत असलेल्या भूत बंगल्यातील जुगाराच्या बैठकीची चर्चा देखील चवीने होत आहे. सदर जुगाराच्या मैफिलीत शिरोडा, आणि वेंगुर्ला येथील लोक तसेच शिरोडा येथील एक लोकप्रतिनिधी देखील असल्याचे समजते आहे. आता जवळपास साठ खेळी आहेत. बैठक सुरू असलेल्या सदर गावचे नाव लिहिल्याने गावची बदनामी होते म्हणून संवादच्या प्रतिनिधीला कॉल आले परंतु आपल्या गावात जुगाराची बैठक बसली असून त्यामुळे गावातील तरुण पिढी बरबाद होईल, त्यामुळे बैठकीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मात्र जबाबदार व्यक्तींनी कॉल का केला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा