…….अन्यथा परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली तीव्र आंदोलन – मनसे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई
मोर्ले गावातील प्रवीण गवस यांचा सतर्कपणा
दोडमार्ग तालुका मधील शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, वैद्यकीय उपकरणे, सोयी सुविधांची वानवा आणि आवश्यक त्या दक्षतेचा अभाव अशी वेगवेगळी कारणे असल्याचे उघड होत आहे. रुग्णालयातील एकूण परिस्थिती सुधारण्याची नितांत गरज आहे अशी भावना मनसेचे दोडामार्ग विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी केली आहे.
दोडामार्ग बाजरपेठ पासून रुग्णालय जवळ आहे. परंतु त्यात कोणत्याही प्रकारच्या सुखसोय नसल्याने रुग्णालयात नागरिक दाखल होण्यासाठी घाबरत आहेत. असे मोर्ले गावातील प्रवीण गवस यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी थेट मनसे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांना संपर्क साधला.
गणेश चतुर्थीला फक्त दहा दिवस बाकी आहेत आणि प्रत्येक वर्षी गणपती उत्सव काळात असंख्य प्रमाणात ग्रामस्थ मुंबई, पुणे मधून दोडामार्ग तालुका मध्ये दाखल होत असतात. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयात सोयी असणे गरजेचे आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
सुस्थितीतील एक्स रे यंत्र अनेक वर्षांपासून बंद आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी उपकरण बिघडलेले आहे. रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाही. इतकेच नव्हे, तर शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. परिणामी, प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रियेची स्थिती निर्माण झाल्यास महिलेवर उपचार होत नाही. ऐनवेळी इतरत्र हलविताना रुग्णासह नातेवाईकांची दमछाक होते. आर्थिक भार पडतो तो वेगळाच.
मृतदेह ठेवण्यासाठीचे शीतगृह तांत्रिक बिघाडामुळे उपयोगी ठरत नाही. यातील पेटी थंड होत नसल्याने पार्थिव अधिक कालावधीसाठी ठेवता येत नाही. मनुष्यबळाचे प्रश्न वेगळेच आहे. गतकाळात ग्रामीण रुग्णालयास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. रुग्णालयाच्या बिकट अवस्थेमुळे अनेक रुग्ण गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी मोठय़ा संख्येने जातात. काही दिवसापूर्वी रुग्णालय मध्ये उपस्थित डॉक्टर, परिचारिकांनी कोणतीही दक्षता न घेतल्याने रात्रीच्या वेळी रुग्णालय मधील सर्व रूग्ण इतर ठिकाणी हलवावे लागले.
आजही अनेक विभागात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. रुग्णालयातील समस्यांकडे कोणीही लक्ष न दिल्याने ही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे.
प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली उपजिल्हा रुग्णालय दोडामार्ग येथे जन आंदोलन करण्याचा तीव्र इशारा मनसे दोडामार्ग विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी दिला आहे.