You are currently viewing कुडाळ शहरात भव्य दहीहंडी उत्सव

कुडाळ शहरात भव्य दहीहंडी उत्सव

सुनील बांदेकर, सिद्धेश शिरसाट यांच्यावतीने आयोजन

जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या औचित्याने कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेलसमोर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत माजी नगरसेवक सुनील बांदेकर आणि युवा उद्योजक सिद्धेश शिरसाट यांच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सात थरांची सलामी लावून हंडी फोडणा-या पथकाला रु २१ हजार आणि चार थर लावून सलामी देत हंडी फोडणा-या पथकाला २ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या कलाकारांचे बहारदार नृत्याविष्कार आणि फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी ही या दहीहंडीची वैशिष्ट्ये असणार आहेत. महिला गोविंदा पथकाच्या सलामीचा थरारसुद्धा या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाला मोठी परंपरा आहे. विशेषतः गिरणगावात दहीहंडीने चांगलेच बाळसे धरले. हळुहळू त्याचा राज्यभरात प्रसार झाला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

मध्यंतरीच्या कालखंडात दहीहंडी न्यायालयीन कचाट्यात अडकली होती. उंचीची मर्यादा, बालगोविंदाचा सहभाग, खेळ म्हणून मान्यता असे अनेक विषय वादग्रस्त ठरले होते. न्यायालयात त्या मुद्यांचा किस काढण्यात आला. अखेरीस दहीहंडीला खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने या उत्सवावरील निर्बंध उठवले असून दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्यात येणार असून त्याचा प्रीमियम सुद्धा सरकारकडून भरला जाणार आहे.

गेल्या दोन वर्षांच्या दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळेच निर्बंधाच्या वातावरणात हा सण उत्साहाने साजरा करता आला नव्ह्ता. आता तीन वर्षानी मोकळ्या वातावरणात जल्लोषात आणि उत्साहात हा सण साजरा होत आहे.

सुनील बांदेकर आणि सिद्धेश शिरसाट यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा हा दहीहंडी उत्सव जिल्ह्यातील भव्य आणि उत्कंठावर्धक उत्सवांपैकी एक असणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभाग घ्यावा तसेच स्थानिक नागरिकांनी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देऊन या रोमांचक आणि करमणूकप्रधान दहीहंडीचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजक सुनील बांदेकर आणि सिद्धेश शिरसाट यांनी केले आहे.तसेच कार्यक्रम संपर्क :नागेश नेमळेकर मो:9404164391

प्रतिक्रिया व्यक्त करा