:-माजी नगरसेविका आनारोजीन लोबो यांचा सवाल
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यावरच उलटतय अस्त्र?
धनाचा झरा त्यांच्या घरी कसा काय पाझरतोय?..सर्वसामान्यांना पडतोय प्रश्न…
नामदार दीपक केसरकर हे गेली साडेसात वर्षे शिवसेनेचे गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, आमदार म्हणून कार्यरत होते. गेल्या दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात भूकंप झाला आणि शिवसेनेचे ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेगळा गट स्थापन करून भाजप शिवसेना युतीचे सरकार बनले. या भाजप सेना युतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले ना.दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पद दिले गेले, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली.
सात वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजप सेना युतीच्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे जबाबदारी होती. त्यावेळी चांदा ते बांदा ही नाविन्यपूर्ण योजना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेचे अध्यक्षपद ना.दीपक केसरकर यांच्याकडे होते. या योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू करण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडीचे सरकार येताच ही योजना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बासनात गुंडाळली आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यावर त्यामुळे अन्याय केला होता.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यामुळे ना.दीपक केसरकर यांनी सदरची योजना पुन्हा सुरू करण्याची करण्यात येईल अशी माहिती दिली. त्याच वेळी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी चांदा ते बांदा या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. तसे पाहता रुपेश राऊळ हे गेली साडेसात वर्षे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना ना.दीपक केसरकर यांचे सहकारी राहिलेले आहेत. ना.दीपक केसरकर यांचे ऑफिस हेच रुपेश राऊळ यांचे दुसरे घर होते. असे सांगताना, दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या आरोपाने केसरकर समर्थक माजी नगरसेविका आनारोजिन लोबो व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी पदाधिकारी संतप्त झाले. शिवसेना तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या आरोपाचे खंडन करताना माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सदरची चांदा ते बांदा योजना बंद होऊन अडीच वर्षे उलटून गेली असताना, व शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे गेली अडीच वर्षे दीपक केसरकर यांच्या ऑफिसमध्येच बसलेले असूनही त्यांनी त्या अडीच वर्षात दीपक केसरकर यांच्यावर चांदा ते बांदा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप का केले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमदार असो किंवा मंत्री त्यांच्याकडे येणारा पैसा ज्या त्या खात्याची कामे असतात त्या खात्याकडे वर्ग केला जातो. आमदार स्वतः तो पैसा खर्च करत नाहीत. त्यामुळे जर का कुठे भ्रष्टाचार झाला असेल असे रुपेश राऊळ म्हणत असतील तर त्या त्या खात्यांवर त्यानी आरोप करावेत, आणि रुपेश राऊळ यांच्या म्हणण्याप्रमाणे जर भ्रष्टाचार झालाच असेल तर तो त्यांनी पुराव्यानिशी उघड करूनच दाखवावा असेही आव्हान राजन पोकळे यांनी दिले आहे.
माजी नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी रुपेश राऊळ यांचे आरोप त्यांच्यावरच उलटवीत ना. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बसून केसरकर यांनी मतदार संघात आणलेला करोडो, लाखो रुपयांचा निधी कोण वाटप करत होते? आणि हे वाटप करत असताना कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे कोण मागत होते? हे प्रश्न उपस्थित करतानाच आपल्याकडे सावंतवाडी तालुक्यातील दोन-तीन कॉन्टॅक्टर येऊन रुपेश राऊळ हे आमच्याकडे कामे वाटप करताना मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करत आहेत, ही बाब आपण ना. दीपक केसरकर यांच्या कानावर घालावी, असे सांगितले होते. असा गौफ्यस्फोट केला आहे. ना. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बसून केसरकर यांनी आणलेला करोडो रुपयांचा निधी वाटप करताना किती मलई रुपेश राऊळ यांनी खाल्ली? हे सुद्धा जाहीर करावे अशी मागणी माजी नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी नेमळे ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा सुरू असताना ना. दीपक केसरकर यांनी रुपेश राऊळ यांच्या खांद्यावर शाल घालून सत्कार केला असता, जर दीपक केसरकर यांच्याकडून भ्रष्टाचार झाला होता तर सद्वर्तनी असणाऱ्या रुपेश राऊळ यांनी त्यांच्याकडून सत्कार कसा काय स्वीकारला? असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. ना. दीपक केसरकर गेली साडेसात वर्षे शिवसेनेचे आमदार, मंत्री अशी विविध पदे भूषवित होते आणि त्यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय न उघडता ना. दीपक केसरकर यांच्याच कार्यालयात दिवस रात्र ठाण मांडून असायचे. या वेळी ना. दीपक केसरकर यांनी राबविलेल्या चांदा ते बांदा योजनेत भ्रष्टाचार होत होता तर ते पाहूनही रुपेश राऊळ गप्प का राहिले? त्यांनी त्यावेळीच सदरचा भ्रष्टाचार का रोखला नाही? शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून त्यांची ती जबाबदारी नव्हती का? शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव या भ्रष्टाचारामुळे खराब होईल याची त्यांना त्यावेळी भीती वाटत नव्हती का? ना. दीपक केसरकर यांनी मतदारसंघात आणलेला लाखो करोडो रुपयांचा निधी कोणी वाटप केला? माजी नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी रुपेश राऊळ यांच्यावर निधी वाटप करताना लाखो रुपयांची मलई खाल्ल्याचा केलेला आरोप कुठंपर्यंत खरा आहे? माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी भ्रष्टाचार उघड करूनच दाखवा हे दिलेल्या आव्हान रुपेश राऊळ पेलणार आहेत का?
राजकीय क्षेत्रात चाललेले हे घाणेरडे राजकारण आणि आरोप प्रत्यारोप याच्या फैरी पाहता राजकीय व्यक्तींकडून हवेत फुसके बार मारून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याची कामे केली जात असल्याचे समोर येत आहे. एकाच ताटात खाणारे खाऊन हात पुसले की लगेच एक दुसऱ्यांवर आरोप करू लागतात. हे राजकारण म्हणजे केवळ मतदारांची थट्टा करण्यासारखे आहे. राजकारणाच्या आडून आपल्या आयुष्यभरासाठी पुंजी जमा करणारे, राजकारणा व्यतिरिक्त कोणताही उद्योग व्यवसाय न करणारे राजकारणी आपल्या रोजच्या खर्चासाठी, महागड्या गाड्या घेऊन फिरण्यासाठी आणि आपले छंद जोपासण्यासाठी नक्की कुठून पैसा आणतात? हा धनाचा झरा त्यांच्या घरी कसा काय पाझरतो? असे न सुटणारे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहेत. आणि त्याची उत्तरे मात्र कोणीही देताना दिसत नाहीत.