सचिन पाटील (अलिबाग)
रायगड:
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आगरी सामाजिक संस्था अलिबागतर्फे आज अलिबागमध्ये वार्षिक अहवालाचा सुंदरसा अंक आगरी समाज भूषण पुरस्कारप्राप्त नामदेव पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.अंकाचे प्रकाशन करतांना मुख्य अतिथी म्हणून नामदेव पाटील म्हणाले, आगरी सामाजिक संस्था अलिबाग ही एक उपक्रमशील संस्था असून, या संस्थेचे कार्य विस्तारले असून ते जागतिक स्तरावर पोहोचले आहे. याचा मला आनंद वाटतो.आगरी संस्था दरवर्षी अहवाल छापते. व प्रत्येक सदस्याला अहवालाचा अंक पोहोचवला जातो. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. आगरी संस्था लवकरच आगरी भवनाची निर्मिती करील याबद्दल दुमत नाही.कैलास पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली हा आनंददायी कार्यक्रम संपन्न झाला.ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सर्व आगरी बांधवांना सोबत घेऊन ऐक्य राखून आगरी संस्था आज रोजी विधायक कार्य करते आहे. गुणीजनांचा सन्मान, पुरस्कार वितरण, या बरोबरच संस्था या वर्षापासून आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार आहे. आज आम्ही संस्थेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.म्हणुनच सत्कार समारंभ, नाट्य अभिनय अशा विविधांगी कार्यक्रमाची रेलचेल आपणास आज या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. डॉ.जगदीश थळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर नामदेव पाटील यांनी वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले.
जीविता पाटील यांना भारतसरकारच्या पार्लमेंटचा भारत भूषण हा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे मिळाल्याबद्दल त्यांचा आगरी संस्थेमार्फत यथोचित हृद्य सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिव रेखा मोकल यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जीविता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
नाट्य अभिनेते प्रकाश ज.पाटील, विजया कुडव व त्यांचे सहकारी यांनी रणांगण या नाटकाचे नाट्यांश सादर करुन कार्यक्रमासाठी जमलेल्या रसिक, मान्यवरांकडून उस्फुर्तपणे दाद मिळवली. प्रकाश पाटील व विजया कुडव यांनी अभंग व भावगीत गाऊन कार्यक्रमात आनंदाचे रंग भरले.
जीविता पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना म्हंटले, मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्या सेवेतून मला प्राप्त झाला आहे. मातीवर पाय ठेवून, नम्रपणे मी यापुढें ही, सामाजिक बांधिलकी जपून, समाजाच्या भल्यासाठी कार्य करीत राहीन.
संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय माळवी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धेश पाटील, सुभाष म्हात्रे, प्रकाश मिसाळ, रवींद्र चांगू पाटील, रवींद्र म्हात्रे, पांडुरंग मानकर, सुनील म्हात्रे, गोविंद म्हात्रे, सौ.अपर्णा म्हात्रे, अशा अनेकांनी परिश्रम घेतले.