-आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतिश सावंत यांची पोलिस अधिक्षक यांच्याकडे मागणी
देवगड तालुक्यातील उमेद अभियान व्यवस्थापक शिवाजी खरात यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (उमेद) देवगड तालुका अभियान व्यवस्थापक श्री.शिवाजी पांडुरंग खरात हे दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी गोगटे हॉल जामसंडे, ता. देवगड येथे आयोजित “रानभाजी खाद्य व विक्री महोत्सव” या कार्यक्रमात शासकीय कार्यालयीन कर्तव्य बजावत असताना त्यांना आमदार नितेश राणे यांच्याकडून आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे बॉडीगार्ड आणि कार्यकर्ते यांनी मारहाण केलेली आहे.
पंचायत समिती देवगड अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (उमेद) आणि कृषी विभाग आत्मा, पंचायत समिती देवगड व नगरपंचायत देवगड यांच्या संतुक्त विद्यमाने या शासकीय कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजच्या मागे नेऊन आमदार नितेश राणे यांनी शासकीय कर्मचारी असलेल्या शिवाजी पांडुरंग खरात यांना तुला संपवतो अशी धमकी देऊन मारहाण करत “ये घ्या रे याला” असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला यानंतर त्यांचे बॉडीगार्ड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेधम मारहाण केली.
या घटनेनंतर श्री. खरात यांनी आपल्या देवगड पोलिस स्टेशन येथे १४ ऑगस्ट २०२२ रोजी आमदार नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर २ वेळा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवून घेण्याची विनंती केली. परंतु नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलिसांवर आणि फिर्यादी श्री. शिवाजी पांडुरंग खरात यांच्यावर दबाव टाकून फिर्याद नोंदवू दिलेली नाही. फिर्याद नोंदवून न घेतल्याने श्री. शिवाजी पांडुरंग खरात भयबीत झाले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. अखेर रात्री देवगड पोलिस ओरोसला दाखल झाले आणि श्री. शिवाजी पांडुरंग खरात यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र या जबाबात श्री. शिवाजी पांडुरंग खरात यांनी आमदार नितेश राणे यांनी आणि त्यांचे बॉडीगार्ड व कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सत्य कथन देवगड पोलिसांसमोर केलेले असताना देवगड पोलिसांनी जाणीवपूर्वक आणि दबावाखाली येऊन आमदार नितेश राणे यांचे नाव वगळले आहे.
आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्याबाबत गुन्हेही नोंद आहेत. तरी या निवेदनाद्वारे आपणांस नम्र विनंती आहे की, श्री. शिवाजी पांडुरंग खरात यांचा नव्याने पुरवणी जबाब घेऊन त्यानुसार फिर्याद दाखल करून घेऊन आमदार नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरीत अटक करावी. अटक न केल्यास सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच येत्या अधिवेशनात शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावतीने या घटनेबाबत आवाज उठवून न्याय मागण्यात येईल याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.