You are currently viewing परतीचा मान्सून राज्यात ८ दिवस सक्रिय…

परतीचा मान्सून राज्यात ८ दिवस सक्रिय…

महाराष्ट्र:

मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र, जाणारा हा पाऊस पुन्हा एकदा राज्याला झोडपण्याची शक्यता आहे. या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. ११ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहू शकते. त्यामुळे सोयाबीनसह कापणीला आलेल्या खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतक-यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिके काढणीला आली आहेत. एक तर सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले होते. आता उभ्या पिकाचे नुकसान होऊ शकते. याशिवाय भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. कोरोनाचे संकट, बाजारातील मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ तसेच कोकणात ब-याचशा ठिकाणी चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

जोरदार वारे वाहणार

येणा-या आठवड्यात (११ ते १७ ऑक्टोबर) महाराष्ट्रात मराठवाडा, कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांवर दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा