*देवगड वाडा येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन*
*आ.वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थितीत*
देवगड :
ज्या व्यक्तीवर अन्याय होतो त्या व्यक्तीने शिवसेना शाखेत संपर्क साधल्यानंतर शाखेतील प्रत्येक शिवसैनिकांमार्फत त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. लोकांचे प्रश्न सुटावे, त्यांना न्याय मिळावा या बाळासाहेबांच्या उद्देशानेच गावोगावी शिवसेना शाखा निर्माण करण्यात आल्या.तसेच काम या शाखेतून होईल.देशात आणि महाराष्ट्रात इतिहास बदलण्याचे काम होत आहे. देशाला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले त्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न होत आहे.महागाई, बेरोजगारीच्या माध्यमातून लोकांवर सुरू असलेल्या अन्याया विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे.स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी ७८ मिनिटे भाषण केले मात्र महागाई, बेरोजगारी बद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत अशी टीका कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली.
देवगड तालुक्यातील वाडा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवानेते संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी शिवसेना लोकप्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सतीश सावंत म्हणाले, शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही त्यांच्या गटातील आमदारांना ते चांगली मंत्रिपदे देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे लोकांना कळत नाही असे चित्र महाराष्ट्रात आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
संदेश पारकर म्हणाले, उद्धवजी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कपटी राजकारणाला नाकारून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले. याचा राग मनात धरून गेल्या अडीच वर्षात उद्धवजींपुढे अनेक संकटे निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र या संकटांचा सामना उद्धवजींनी धैर्याने केला. कोरोना काळातही उद्धवजी ठाकरे यांनी डगमगून न जाता चांगल्या पद्धतीने काम केले. त्याचमुळे शिवसेनेला रोखण्यासाठी साम,दाम,दंड,भेद सर्वकाही वापरून उद्धवजींना मुख्यमंत्रीपदापासून खाली खेचण्यात आले. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी पेटून उठून येत्या काळात भाजपला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असे सांगितले.
संजय पडते म्हणाले, कितीही संकटे आली तरी शिवसेना डगमगणार नाही. सर्व शिवसैनिकांची साथ उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत,ग्रामपंचायत निवडणुका येत्या काळात होणार असून प्रत्येक शिवसैनिकाने मैदानात उतरून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. कोणीही कितीही आमीषे दिली तरी त्यांना बळी पडू नका. सदस्य नोंदणीवर भर द्या असे आवाहन केले.
*भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर जोशी म्हणाले, मी शिवसेनेचा कार्यकर्ता नाही.परंतु उद्धवजी ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची भाजप आता राहिली नाही, ही भाजप आयाराम गयारामांची झाली आहे. ज्या पद्धतीने शिंदे सरकार बनले आहे. त्यामुळे या सरकारवर जनतेचा रोष आहे. आणि तो रोष मतपेटीतून व्यक्त होईल असे जोशी यांनी सांगत शिवसेनेतील अनेक आमदार खासदार फुटून गेले असले तरी आ. वैभव नाईक निष्ठावंत राहिले याबद्दल सुधीर जोशी यांनी त्यांचे कौतुक केले.*
याप्रसंगी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर जोशी, माजी जि प सदस्य प्रदीप नारकर,भाई परब,गोट्या वाडेकर, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपतालुका प्रमुख बुवा तारी,उपतालुकाप्रमुख नितीन घाडी, नगसेवक विशाल मांजरेकर,नितीन बांदेकर,माजी जि प सदस्य,महिला तालुकाप्रमुख वर्षा पवार, वाडा सरपंच सुनील जाधव, उपसरपंच विनायक घाडी, बंडू जोशी, सुनील तेली, सरपंच मृणाली राणे,विभागप्रमुख संदीप डोलकर,विभागप्रमुख रमा राणे,युवासेना अधिकारी गणेश गावकर,दिनेश गावकर, परीट काझी,माही परब, सुहास वाडेकर, यदु ठाकूर, श्री. भेकरे आदीसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.