ना. दीपक केसरकर यांचा सल्ला
जहरी टिका…. स्वतःचा सत्कारही…
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा आज ना.दीपक केसरकर यांच्या हस्ते व भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत पार पडला. नेमळे हे दीपक केसरकर यांच्या सोबत गेली सात,आठ वर्षे शिवसेना पक्षात एकत्र काम केलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचे गाव… केसरकरांच्या माध्यमातून रुपेश राऊळ यांनी गावात विकासकामे देखील करून घेतली. याच नेमळे गावच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दीपक केसरकर, शिक्षणमंत्री यांच्या हस्ते १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनुपस्थित असलेले माजी पं. समिती सदस्य तथा शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे कट्टर समर्थक रुपेश राऊळ यांना ना.केसरकरांनी “रुपेश कुठेय?, जास्त उशीर करू नका, लवकर या…!” असे आवाहन करताच रुपेश राऊळ ग्रामसचिवालयात आले….ना.केसरकरांनी त्यांचे शाल घालून स्वागत केले… त्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चर्चेची कवाडे सताड उघडी झालेली दिसली.
एकीकडे ना.दीपक केसरकरांनी शिवसेनेच्या अंतर्गत धुसफूशीमुळे शिंदेगटात सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झाले. ना.केसरकरांच्या विरोधात गद्दारी केली म्हणून घोषणांच्या आरोळ्या ठोकण्यात आल्या…संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी विरोधी मोर्चा काढला…युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची सावंतवाडीच्या गांधी चौकात सभा लावून खासदार राऊत यांनी टीकास्त्र सोडले आणि ही सभा “न भूतो न भविष्यती” होणार अशी सिंहगर्जना करून संवाद यात्रेच्या सभेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख ना.केसरकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नेमळे या स्वतःच्याच गावी केसरकरांकडून शाल, श्रीफळ स्वीकारतात हा मात्र सर्वानाच आश्चर्याचा धक्का देणारा क्षण ठरला…! त्यामुळे उपस्थितांमध्ये पक्ष नेतृत्वाला हा सत्कार आवडेल का? अशी चर्चा मात्र रंगताना दिसून आली.
मागील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले नाम.केसरकर व राजन तेली बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना सत्ताधारी शिंदेगट आणि भाजपाचे हळूहळू स्थानिक पातळीवर मनोमिलन होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काहीच दिवसांपूर्वी ना.केसरकरांच्या वक्तव्यावर माजी खासदार निलेश राणेंची बोचरी टीका आणि जिल्हाध्यक्ष राजन तेलिंचा “केसरकरांनी शब्दांना लगाम घाला” असा सल्ला या पार्श्वभूमीवर आजचे एकत्र आलेलं व्यासपीठ बरेच काही बोलून गेले.
नेमळे ग्रामसचिवालय उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरपंच विनोद राऊळ, तळवडे मतदारसंघाचे माजी जि.प. सदस्य पंकज पेडणेकर, शिवसेना तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य नेमळे रुपेश राऊळ आणि भाजपा, शिवसेना कार्यकर्ते, नेमळे ग्रामस्थ उपस्थित होते.