You are currently viewing गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी

अवघ्या 15 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या. येथील नियोजन समितीच्या नुतन सभागृहात आज श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

                या बैठकीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

                राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी साठत असलेल्या पाण्याची समस्या सोडवण्याची सूचना करून शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. हे खड्डे बुजवत असताना कोल्ड मिक्स पद्धतीने बुजवावेत. सर्व स्ट्रीट लाईट सुरू करण्याची कार्यवाही करावी. बंदर विभागाने त्यांच्या गस्तीनौका तातडीने प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही करावी. तिलारी पाणी योजना वेळेत पूर्ण होईल यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नियोजन करावे. एमआयडीसी विभागाने आडाळी एमआयडीसी भूखंड वाटपाचे काम सुरू करावे. आरोग्य विभागाने गणेशोत्सव काळात साथरोग येणार नाही याचे नियोजन करावे. तसेच या काळात वाहतुक कोंडी होणार नाही यासाठीही नियोजन करण्यात यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा