कुडाळ :
कुडाळ शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय अखंड भारत दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीय संवर्धन मंडळ देवगड यांनी या ७.३० किमी. अखंड भारत दौड मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता ही दौंड जिजामाता चौक कुडाळ येथून सुरू होणार आहे. तर मराठा समाज सभागृह येथे या दौंडचा समारोप होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाच्या वतीने अखंड भारत दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्ष १५ ते ६० या दरम्यानचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीक यात सहभागी होणार असून यासाठी गुगल फॉर्म भरून पूर्व नोंदणी करून घेण्यात आली आहे.
कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते झेंडा दाखवून अखंड भारत दौडीला प्रारंभ होईल. समारोप प्रसंगी विवस्वान हेब्बाळकर हे प्रमुख वक्ते तर रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक रवी मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात सा. विवेक प्रकाशित ‘अखंड भारत का आणि कसा?’ तसेच सांस्कृतिक वार्तापत्र निर्मित ‘फाळणीच्या व्यथा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. चालत किंवा धावत ७.३० किमी. चे अंतर पूर्ण करतील, अशा सर्वांना पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.