You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख

 

ऑगस्ट महिना आला की इतिहासाची पाने ऊलगडतात.

इतिहास शौर्याचा.इतिहास अभिमानाचा. आमच्या पीढीसाठी तर तो ह्रदयात भिनलेला. मनावर स्वार झालेला. पाठ्यपुस्तकातून घोकलेलाही. आवेशाने लिहीलेली प्रश्नांची परिक्षेतली उत्तरेही..इतिहासाच्या पानापानावरची ती घटनांची चित्रे आजही तशीच्या तशी दिसतात…

नऊ अॉगस्ट आणि पंधरा अॉगस्ट या कॅलेंडरवरच्या ठळक तारखा.

तसं म्हटलं तर दोनशे वर्षाच्या ब्रिटीश गुलामगिरीच्या काळात १८५७ पासून स्वातंत्र्यासाठी अनेक लढे,अंदोलने झाली.मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर भारताला तात्काळ स्वातंत्र्य देण्यासाठी, ब्रिटीश शासनाच्या विरुद्ध ९अॉगस्ट १९४२ रोजी अहिंसक, साविनय अवज्ञा अंदोलन पुकारले गेले. क्रिप्स मिशन करारातले ब्रिटीशांनी नमूद केलेले मुद्दे अत्यंत असमाधानकारक होते. परिणामी, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीच्या नऊ अॉगस्ट १९४२ रोजी ,गवालिया टँक मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनात “छोडो भारत”(quit India) अंदोलनाची हाक महात्मा गांधी यांनी दिली. तेव्हांपासून अॉगस्ट क्रांती मैदान अशी ऐतिहासिक ओळख या ठिकाणाला मिळाली. आणि या दिवसाची क्रांती दिन म्हणून नोंद झाली. या अंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनअंदोलनात सामील झाले. युवकांचा सहभाग अधिक होता. करेंगे या मरेंगे हा मंत्र, ही गर्जना, घोषवाक्य हजारो तरुणांच्या नसानसात भिनले.!! इंग्रजांना ही परिस्थिती हाताळताना नाकी नउ आले. त्यांनी लाठीहल्ला, गोळीबार केला. काही नेत्यांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले. अंदोलनाला हिंसक वळणही लागले. गांधीजींनाही अटक झाली. मात्र अरुणा असफ अलीचे नेतृत्व या अंदोलनास लाभले. गांधीजींनी या वेळी युवकांना आवाहन केले होते की “नुसतेच कार्यकर्ते नका बनू, नेते व्हा…”

हे अंदोलन फसले नाही पण सफलही झाले नाही. कदाचित नियोजनाच्या अभावामुळे असेल..पण बलीदान व्यर्थ गेले नाही. या अंदोलनामुळे प्रचंड उद्रेक झाला. स्वातंत्र्याची पहाट उगवली..

ई.स.वि. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

विसाव्या शतकात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी “चले जाव.” अंदोलन पुकारले. आणि दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या लक्षात आले ,आता आपल्याला भारतावरचे राज्य,युद्ध सांभाळता येणार नाही. क्रांतीकारक उसळले होते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जुन १९४७पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.त्यावेळी माउंटबेटन हे व्हाॅइसरॉय होते. मात्र मुस्लीम लीगचा प्रभाव, मतभेद, जीना विचारसरणीचा उदय या संधीचा फायदा घेउन ब्रिटीशांनी Devide and Rule ची अंडर करंट पाॅलीसी वापरलीच. अखेर १५आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. युनीअन जॅक उतरला आणि भारताचा तिरंगा फडफडला. तो अविस्मरणीय आनंदाचा ऐतिहासिक क्षण गुलामगिरीचे जोखड उतरल्यामुळे भारतीयांनी प्रचंड जल्लोषात साजरा केला. पण त्यावेळीच भारताचे पाकिस्तान आणि भारत असे तुकडे झाले.

पाकीस्तानात रहाणार्‍या अनेक पंजाबी सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यात मारलेही गेले. प्रचंड हिंसा, कत्तली झाल्या. याचे पडसाद अजुनही पुसले गेले नाहीत. या विभाजनानेच काश्मीरचा प्रश्नही पुढे आला, जो आजही सतावत आहे…

Tryst with destiny हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचे स्वातंत्र्य दिवशी दिलेले भाषण..ते म्हणाले होते, “स्वातंत्र्य आणि सत्ता मिळाल्या नंतर जबाबदारी वाढते.

आतां खूप कष्ट घ्यायचे आहेत. we have hard work ahead. आराम हराम है। जोपर्यंत आपण देशासाठी घेतलेली शपथ पूर्ण करीत नाही…..”

यावर्षीचा हा ७४वा स्वांतंत्र्यदिन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली येथे लालकिला लाहोरी गेटवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल,जन गण मन ची धुन वाजेल. देशाला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण होईल.

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेउन ,देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी प्राणाहुती दिली अशा अमर हुतात्म्यांचे स्मृतीदिन म्हणून या दोनही दिवशी आपण त्यांना मानवंदना देतो.आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. पंधरा आॉगस्ट हा राष्ट्रीय सण मानतो…..

मात्र इतिहासाकडे मागे वळून पाहता ,मनांत येते ,स्वातंत्र्यपूर्व काळातील ती पीढी, अंशत:च उरली असेल. आणि स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासत घडलेली पीढीही आयुष्याच्या उतरंडीवरच..या अभिमानाच्या इतिहासाला पुढची पीढी कशी बघेल…स्फुरेल का काही त्यांच्याही नसांतून…वर्षानुवर्षे उभी राहिलेली स्मारके,पुतळे यांच्याशी त्यांचा नेमका काय संवाद साधेल..??इतिहासाची ही सुवर्णपाने अखंड राहतील की वितळून जातील..? हरताल, उपोषण असहकार अंदोलन या शब्दांच्या व्याख्या त्यांच्यासाठी नक्की काय असतील…? पूर्वजांनी देशाची तळी ऊचलून, रक्तरंजीत भंडारा उधळून घेतलेल्या शपथेशी आजच्या पीढीची काय बांधीलकी असेल ?असेल की नसेल?

प्रश्न असंख्य आहेत…. चालू समस्यांची बीजे भूतकाळातच शोधत बसणार, दोषांचा भार टाकून मोकळे होणार की उपायासाठी नवा अभ्यास करणार…??

काळच ठरवेल…

बाकी या दिवशी मिळणारी सुट्टीच महत्वाची…

पंधरा आॉगस्टला कॅलेंडरवर रविवार नाही ना याचेच समाधान…!!! असो…

 

स्वतंत्र्यासाठी बलीदान देणार्‍या हुतात्म्यांना आदरांजली..!!

 

सौ. राधिका भांडारकर

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा