You are currently viewing वचन-सूत्र

वचन-सूत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालीत्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन-रायबागकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*वचन-सूत्र*

 

आषाढ संपता संपता चाहूल लागते श्रावणाची…श्रावण, मनभावन श्रावण, ओला-हिरवा श्रावण, इंद्रधनुच्या सप्तरंगातील श्रावण, कविवर्य बा.भ बोरकर यांनी वर्णन केलेल्या कवितेतील स्रृष्टीला पाचवा महिना लागलेला श्रावण…

 

श्रावण महिन्यात सर्वात लगबग असते महिलांची…महिनाभर चालू असलेली व्रतवैकल्यं, नागपंचमी, मंगळागौर, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा, सोमवार, शुक्रवार एक ना दोन…शिवाय प्रत्येकाची वेगळी रीत…

 

आला आला श्रावण

आला मनभावन

घेऊनीया संगतीला

उत्सव आणि सण

 

पण जुन्या जाणत्या स्त्रियांना जरी या सगळ्यात जास्त रस असला तरी तरुणींना मात्र वेध असतात राखी पौर्णिमेचे…

 

नागपंचमीला झोके बांधायला झाडं दिसत नाहीत आणि पोळ्याला पूजा करायला बैलं सापडत नाहीत. शिवाय तेवढा वेळ तरी कुठं असतो कोणाकडे आजकाल…राखी पौर्णिमेचं मात्र तसं नाही हं…प्रत्यक्ष जाता आलं नाही तरी राखी कुरिअरने पाठवता येते. त्यासाठी बाजारात जाऊन निवडून निवडून राखी आणली जाते. आणि व्हिडिओ कॉल वर भावाने ती बांधलेलीही पाहिली जाते.

 

खरंच, आजकाल तर खूप महत्त्व आलंय या राखीला…उत्तर हिंदुस्थानातील ही रीत आपण भाऊबीजेइतकीच उत्साहाने स्वीकारलीय. राणी कर्णावतीने हूमायूंला राखी पाठवून रक्षण करण्याची विनंती केली. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया अबला होत्या (अर्थात अजूनही अपवादात्मक आहेतच) आणि पुरुषप्रधान संस्कृतीत बलवान पुरुषांचाच त्यांना आसरा घ्यावा लागत होता. त्याचे प्रतिक म्हणून राखीचा धागा बांधण्याची पद्धत रूढ झाली.

 

पण आता स्त्रिया शिकत आहेत. मानसिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. मग केवळ उपचार म्हणून भावाला राखी बांधायची एवढाच त्याचा अर्थ उरतो. त्या राखीची ओवाळणी म्हणून काय मिळणार आहे याचीच उत्सुकता जास्त असते. कधी कधी एखाद्या कुटुंबात दोन-तीन बहिणी मिळून एकच भाऊ असतो, तोही वयाने लहान, अशावेळी त्याच्याकडुन बहिणींनी ओवाळणीची आणि रक्षणाची अपेक्षा तरी कशी ठेवायची! किंबहुना कधी कधी त्याचेच रक्षण करण्याची आणि त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी बहिणींना घ्यावी लागते.

 

आणि शिवाय एखाद्या कुटुंबात फक्त मुलीच असल्या तर त्यांनी काय करायचं? अशावेळी त्या बहिणींनीच एकमेकींना राखी बांधली तर काय हरकत आहे?

 

नसे बंधू म्हणून आम्ही करीत नाही खंत

पाठोपाठच्या आम्ही बहिणी असुच भाग्यवंत

एकमेकींना राखी बांधून करू रक्षण परस्परांचे

हवाच पुत्र मग हट्ट कशाला? करू सार्थक स्त्री जन्माचे

कर्तृत्ववान स्त्रियांची चालवू परंपरा ही पुढे

राखीच्या नाजूक धाग्यात शक्ती अशी सापडे

 

शिवाय पूर्वीच्या खेड्यात असल्याप्रमाणे आता आपापल्या धर्माच्या, जातीच्या वस्त्या वेगवेगळ्या राहिलेल्या नाहीत.

जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सर्वांनाच भिन्नधर्मीय शेजारी लाभत आहेत. आणि एखाद्या संकटात दूर राहणाऱ्या आपल्या नातलगांपेक्षाही शेजारीच शेजारधर्म निभावतांना दिसतात. मग अशावेळी म्हणावसं वाटतं…

 

सण रक्षाबंधनाचा, स्नेहल नात्याचा

न राहो फक्त भावा-बहिणींचा

परंपरेच्या चौकटीतून जरासा बाहेर पडून तो व्हावा…

बहिणी-बहिणींचा, मित्रा-मित्रांचा,

सख्ख्या शेजाऱ्यांचा…

काय हरकत आहे?

आपल्या भिन्न धर्मीय स्नेह्यालासुद्धा राखी बांधून पाहायला…

मनातील आपुलकीचे दृश्य रूप साकारायला

या रेशीम धाग्याचे नाजूक बंधन नक्कीच दृढ करील

नाते आपले स्नेहाचे, प्रेमाचे, संवादाचे…

 

कधी एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषात सख्ख्या बंधुप्रेमाचा इतका ओलावा सापडतो की ते मानलेलं नातं आहे हे सांगूनही खरं वाटत नाही. कारण त्याला राखी बांधतांना…

 

द्रौपदी मी आणि कृष्ण सखा तू

नाते तरल मनाचे

हाक मारता येशील धावून

खात्री मजला वाटे

राखीचे हे नाजूक बंधन

नकोस मानू बेडी

रक्षण करण्या आज समर्थ जरी

ही बहीण तुझी रे वेडी

पाठीवरती फक्त हात ठेवुनी मनाला

दे जरा आधार

हळुवार भावनांच्या मध्ये पण

नच आणूया व्यवहार.

 

ही अशीच निरपेक्ष भावना दोघांच्याही मनात असते.

 

आणि शेवटी अशा कित्येक वेगवेगळ्या नात्यांनी रक्षाबंधन साजरे केले तरीही आपल्या भावाच्या मनगटावर सूत्र बांधताना बहिण वचन मागतेच…

 

राखी सांगे बंधुराया

मज बांधून घे हाताशी

आहेच तुझे नाते माझ्या

रेशीम धाग्यांशी

या धाग्यामध्ये गुंफिली

भाऊ बहिणीची माया

सत्वर धावून येशील ना

मज संकटात ताराया

नारी जरी ही सबला झाली

आधार हवा भावाचा

राखी बांधून दे विश्वास

सण रक्षाबंधनाचा.

 

भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

८-८-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा