मालवण (मसुरे) :
मसुरे देऊळवाडा येथील मूळ रहिवासी आणि मुंबई लोअर परेल विजय नवनाथ संघातील हर्ष महेश लाड याची निवड प्रो कबड्डी सीजन नाईन साठी पुणेरी पलटण संघात झाली आहे. पुणेरी पलटणच्या संघ व्यवस्थापन निवड टीमने हर्ष लाड याला सहा लाख रुपये बोली लावून संघात स्थान दिले आहे. उत्कृष्ट डिपेंडर असलेल्या हर्ष लाडच्या निवडीमुळे मसुरे गावात जल्लोष होत असून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्याच आठवड्यात मुंबई येथे प्रो कबड्डी सीजन नाईन ची खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये पुणेरी पलटण संघाने मूळ मसुरे देऊळवाडा गावचा सुपुत्र असलेला आणि मुंबई लोअर परेल येथे विजय नवनाथ क्रीडा मंडळाचा खेळाडू हर्ष लाड याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. हर्ष याच्यासाठी सहा लाख रुपयाची बोली लावण्यात आली होती. हर्ष हा विविध शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच नॅशनल कबड्डी स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू असून संपूर्ण देशामध्ये तो डिफेंडर म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हर्षा ज्युनियर नॅशनल कबड्डी, ज्युनियर स्टेट कबड्डी, मुंबई युनिव्हर्सिटी कबड्डी, सीनियर स्टेट कबड्डी तसेच बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, न्यू इंडिया इन्शुरन्स, सेंट्रल रेल्वे डिव्हिजन अशा विविध संघांकडून त्याने कबड्डी साठी प्रतिनिधित्व केलेले आहे.
अशा विविध मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट डिफेंडर म्हणून बक्षिसे मिळविलेली आहेत. हर्ष हा मुंबई येथील प्रसिद्ध अशा रिजवी कॉलेजमध्ये एम कॉम च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून त्याला मार्गदर्शन म्हणून त्याचे वडील महेश लाड आणि प्रशिक्षक म्हणून विशाल कदम सर करत आहेत. हर्ष याने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे पुणेरी पलटण संघाकडून त्याला संघात स्थान दिले गेले. यावेळी बोलताना हर्ष लाड म्हणाला पुणेरी पलटण संघामध्ये इंटरनॅशनल इराणचे खेळाडू फजल अत्राचालि, असलम इनामदार, पंकज मोहिते यासारख्या अनेक नावाजलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मिळणार हेच माझ्यासाठी मोठे आहे. मिळालेल्या एका संधीचे सोने करून आपल्या पुणेरी पलटण संघाला प्रो कबड्डी सीजन नाईन चे विजेतेपद मिळवून देण्याचा आपला मानस असून यासाठी अतिशय कठोर सराव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कठोर मेहनत केल्याशिवाय कबड्डीमध्ये चांगली कामगिरी करता येत नाही यासाठी जास्तीत जास्त सराव हा आवश्यक आहे. तसेच माझ्या मसुरे गावातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवान खेळाडू घडविण्यासाठी जर माझा उपयोग होत असेल तर त्यासाठी 100% योगदान देण्यास मी तयार आहे. माझ्याबरोबर माझ्या गावातील माझ्या जिल्ह्यातील खेळाडूही कबड्डीमध्ये पुढे आले पाहिजेत. आज प्रो कबड्डी ने कबड्डी ला सोनेरी दिवस दाखविले आहेत. यामुळे भविष्यात कबड्डीमध्ये सुद्धा चांगले करिअर घडवण्याच्या अनेक संध्या उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच मला नेहमी साथ देणारे माझे वडील महेश लाड आणि प्रशिक्षक विशाल कदम आणि माझा संपूर्ण परिवार, तसेच विजय नवनाथ क्लब लोअर परेल यांच्या पाठिंब्यामुळे माझा कबड्डीचा प्रवास इथे येऊन पोचलेला आहे. भविष्यात भारतीय कबड्डी संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न असल्याचेही बोलताना हर्ष लाड म्हणाला. हर्ष लाड जेव्हा मसुरे गावामध्ये येणार आहे. तेव्हा गावाच्या वतीने त्याचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे.