मुंबई :
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.
मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.