You are currently viewing एका धुंद सांजवेळी…

एका धुंद सांजवेळी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*एका धुंद सांजवेळी…*

ती आली….तिने पाहिले… अन् ती गेली सुद्धा…..!
हो…, तीच ती…बेधुंद, बेहोशीची मंतरलेली तांबडी शाल पांघरणारी…सागराच्या लाटांवर हिरे मोती चमकविणारी…अगदी अवकाशालाही पाण्यावर आणून ठेवत क्षितिज पाण्यावर तरंगतेय असा भास निर्माण करणारी…शुभ्र चांदण्यांची नभांगणी पखरण करणारी…सांजवेळी…!

*अलगद नेत्र कटाक्षांनी*
*तुज पिउनी घेतले नयनी..*
*तनमन जाहले मंदधुंद*
*या सांजवेळच्या क्षणी*

या नेत्र कटाक्षांनी सांजवेळचं ते अवर्णनीय सौंदर्य अलगद नयनांनी टिपून घेतलं… पापण्यांच्या आड दडवून ठेवलं…अवकाशात उडणारी पाखरांची रांग किती प्रमाणबद्ध, लयबद्ध रेषेत उडत होती…अगदी डोळ्यांचे पारणे फेडत होती…
शांत पहुडलेल्या सागराच्या पाण्यावर मंद तरंग येत होते…रवीची ओसरणारी तांबडी किरणे आपले गाठोडे बांधत निरोपाच्या तयारीत होती जणू दिवसभराचा शीण त्यांच्या चेहऱ्यावर…त्यांच्या हालचालीतून जाणवत होता…गलितगात्र होऊन तांबडी किरणे पाण्याच्या तरंगात विलीन होत होती… रवी अन् जलाच्या प्रेमात किरणांची देवाणघेवाण व्हावी तशी किरणे जलात लुप्त झाली…रवीचं तेज ओसरलं… चंद्राची शीतल छाया अलगद आपले पाय पसरू लागली…
तुझ्या पाऊलांतील पैंजणांचा नाद कानात घुमू लागला…
*तो नाद पैंजणांचा…कानाशी बोलताना…*
*खुणावतो मजला…या धुंद सांजवेळी…*
त्या मंजुळ नादाने वेडावलो… खेचून आलो सागर किनारी…सामोरी दिसता तू…तुझा कोमल…गुलाबी चेहरा…माझ्या नयनांनाहीं लाजवू लागला…
*शृंगार तुझा यौवनातील…नजरेने शोधताना…लाजवतो नयनांना… या धुंद सांजवेळी….!* तुझ्या गालावरची नाजूक खळी… माझ्या मनाला खुणावू लागली…अलगद टेकता अधर…खळी विसावली मम् अधर पाकळीत…!
तुझ्या रेशमी बटा कुन्तलांच्या…उडता चेहऱ्यावरी…शहारली…मोहरली… तुझी नाजूक काया…या धुंद सांजवेळी…!
*तू माळलेला गजरा कुंदकळ्यांचा… सुवास तो फुलांचा…वेडावतो मनाला…या धुंद सांजवेळी…!*
केशसंभार करुनि तू सागरतटी येउनी विसावली माझ्या बाहुपाशात… तो चंद्र साक्षीला तिष्ठत उभा त्या माडबनाच्या आडोश्याला…चोरून पाहतोय तुझ्या नि माझ्या प्रेमाचा अविष्कार…चांदण्यांनी पखरण केलेली शाल ओढून तू अन् मी बेधुंदपणे एकमेकांच्या बाहुत विसावलो…चंद्राची शीतल छाया अंधारावरही मात करून नकळत चंदेरी प्रकाशाची उधळण करत साथ करत होती सांजवेळच्या मिलनास…!
तुझ्या नि माझ्या भेटीसाठी सांजही नटून थटून…अवकाशातून दीपमाळा अलगद धरणीवर सोडून…सागराच्या असंख्य लहरींवरून हिऱ्या मोत्यांचे प्रकाशझोत टाकून आसमंत दिपवून सोडत होती…मिणमिणत्या काजव्यांनी देखील आपला प्रकाश टाकून…सांजवेळेला आपलंही वेगळेपण दाखवून देत सौंदर्यात चार चाँद लावले होते…
कधीतरी हवेची थंडगार झुळूक येत होती…शहारून तू माझ्या बाहुत शिरत होतीस…तुझ्या तनाचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटायचा…माझ्या बाहुत शिरताना बावरलेला तुझा मुखडा, गालावर खुललेलं मोहक हास्य…सारं काही विलक्षण भासत होतं… या धुंद सांजवेळी…!
एका सांजवेळच्या या स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत तू अन् मी बेभान होऊन हिंदळत राहिलो…न होती तमा कशाची ना होती कुणाची पर्वा… ‘तू’ ‘मी’ अन् सोबतीला ‘ती सांजवेळ’…मायेची, प्रेमाची, तुझ्या नि माझ्या अतूट नात्याची साक्ष…!
चंद्राने माड बनाचा आडोसा सोडला…आता तर तो वाकून पाहू लागला…रातकिड्यांची किर्रर्रकिर्रर्र वाढू लागली…तशी तुझ्या छातीत धडधड वाढली… श्वासांनी श्वासांना रोखून धरले…तृप्त होउनी अधरांनी निरोप घेतला…माझ्या हातातील तुझा हात हळूहळू दूर दूर जात असल्याची जाणीव होऊ लागली…सांज ढळली अन् रात्रीच्या काळोखाने वेढा घातला… त्या किर्द काळोखात….तुझा हात सुटून गेला…
*माझ्या हातातील तुझा हात*
*अलगद सोडवून घेताना…*
*मला जाणवत होत्या वेदना*
*तुझ्या नाजूक मनाला होताना…*

जेव्हा जेव्हा मी माझा हात पाहतो…तेव्हा तेव्हा हातावरील भविष्य रेषांत तुझाच चेहरा शोधत राहतो…!!

©【दीपि】
दीपक पटेकर, सुंदरवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा