पुनित बालन गृप प्रस्तुत 49वी राज्यस्तरिय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धा नाशिकमध्ये
सिंधुदुर्ग
पुनित बालन ग्रूप पुणे प्रस्तुत, आणि महाराष्ट्र ज्यूदो संघटनेद्वारा आयोजित 49वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट खुली स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा सोमवार, मंगळवार आणि बुधवारी नाशिक येथे संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेद्वारा आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.राज्यभरातू जवळपास 130 पुरुष आणि 90 महिला ज्यूदोपट्टूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत.
नाशिक जिल्हा ज्यूदो संघटनेच्या सहकार्याने हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडीयममध्ये तीन दिवस यास्पर्धा संपन्न होणार आहे.
स्पर्धकांचे आगमन 8 ऑगस्ट, सोमवारी होईल, या दिवशी स्पर्धकांची नावनोंदणी,वजने घेणे, स्पर्धेचे लॉट्स टाकणे यासह मॅनेजर्स मिटिंग हे कार्यक्रम होतील..
*उद्घाटन सोहळा मंगळवारी-*
स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आम. राहुल ढिकले यांच्या हस्ते मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी होईल. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पश्चात स्पर्धांना प्रारंभ होईल. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे असून यावेळी मित्र बिहारचे अध्यक्ष विनोद कपूर, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, उपाध्यक्ष आणि नाशिक ज्यूदो संघटनेचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, सहसचिव डॉ.गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रवी पाटील, सचिव दत्ता आफळे, डॉ. सतीश पहाडे, सौ अर्चना पहाडे, जयेंद्र साखरे या पदाधिकाऱ्यांबरोबरच नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक विजय पाटील आणि स्पर्धा संचालक शैलेश देशपांडे यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
*आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग*
जवळपास 26 जिल्ह्यातील सव्वादोनशे ज्यूदोपटू आपले कौशल्य या दोन दिवसात आजमावणार आहेत. या स्पर्धा राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा असल्याने स्पर्धेतील विजेते लखनौ येथे आयोजित 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र चे प्रातिनिधीला करतील.
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या राज्यातील या खेळाडुमध्ये नाशिकचा आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू अजिंक्य वैद्य, औरंगाबादची आशियाई स्पर्धेत कांस्य पदक विजेती श्रद्धा चोपडे, ठाण्याची अपूर्वा पाटील, क्रीडा प्रबोधिनीची समीक्षा शेलार यांच्या बरोबरीने दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त केलेले आदित्य परब आणि गौतमी कंचन- पुणे, केतकी गोरे- नागपूर, शायना देशपांडे- ठाणे, आदित्य धोपावकर- अहमदनगर, प्रदीप गायकवाड-सोलापूर या खेळाडूंची अव्वल कौशल्ये पहाण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
यातील अपूर्वा पाटील, अजिंक्य वैद्य यांनी सलग तीनवेळा राज्य स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला असून पुण्याचा विकास देसाई याने सलग दहा वर्ष प्रथम क्रमांक कायम ठेवला असून अकराव्यांदा आपले स्थान कायम टिकवण्यासाठी तो या स्पर्धेत उतरत आहे.
स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील वीस पंचांची नियुक्ती राज्य तांत्रिक समिती तर्फे करण्यात आलेली असून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे हे स्पर्धा संचालक आहेत. नुकतीच आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्मिता शेट्टी, शिल्पा सेरिगर या मॅट प्रमुख म्हणून काम पाहतील. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाशिकच्या स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य योगेश शिंदे, सामील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैद, माधव भट आदी प्रयत्नशिल आहेत.