कुडाळ :
कुडाळच्या माजी सरपंच सौ. आशा अशोक आळवे यांचे गोव्यातील बांबुळी हाॅस्पीटल मध्ये दुःखद निधन झाले. त्यांचे वय वर्षे ५१ होते. आज दुपारी ३.३० वाजता बांबुळी हाॅस्पीटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई मधून गावी आल्यानंतर त्यांना ताप आला होता. यानंतर त्यांना कुडाळ मधील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने बुधवारी मध्यरात्री त्यांना गोव्यातील बांबूळी हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज दुपारी त्यांची तब्येत अचानक खालावल्याने निधन झाले.
सौ. आशा आळवे ह्या उच्चशिक्षित होत्या. त्यांचे बी.काॅम.पर्यंतचे शिक्षण झाले होते. कुडाळ शहरात त्यांचे माहेर तर लक्ष्मीवाडी येथे सासर होते. कुडाळ शहराचे सरपंचपद त्यांनी भूषवले होते. नारायण राणे काँग्रेस मध्ये असताना त्या कुडाळ मधील लक्ष्मीवाडी मधून काँग्रेस तिकीटावर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. २००७ ते २०१२ असे सलग पाच वर्ष त्या कुडाळच्या सरपंच म्हणून विराजमान झाल्या होत्या. कुडाळ शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्या कुडाळात परिचीत होत्या.
कुडाळ बाजारपेठेतील गणेश फरसाण मार्टचे मालक व लक्ष्मीवाडीतील रहिवासी अशोक गणपत आळवे यांच्या त्या पत्नी होत. तर आळवे फरसाण मार्टचे गणपत आळवे यांच्या त्या वहिनी होत. तर कसाल येथील सौ. मेघा अशोक बांदेकर यांची ती मोठी बहीण होय. त्यांच्या निधनाने कुडाळ लक्ष्मीवाडीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता कुडाळातील स्मशान भूमित अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, मुलगी, सुन, दीर, भावजय, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनानंतर भाजपसह अन्य पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लक्ष्मीवाडीत धाव घेत आळवे कुटुंबीयांचे सांत्वन केले.