You are currently viewing चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणावर कारवाईची मागणी

चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणावर कारवाईची मागणी

सावंतवाडी :

न्हावेली येथील रास्त धान्य दुकानात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणावर योग्य ती कार्यवाही करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन दिला आहे.

न्हावेली येथील धान्य दुकानामधून गेली कित्येक वर्षे कार्यालयीन वेळेनुसार धान्य वितरीत केले जात नाही. प्रत्येक महिना धान्यसाठा कमी मागणी केलेला असतो व विचारणा केली असता धान्य संपलेले आहे, असे सांगितले जाते. तसेच ऑनलाईन मशिनला अंगठा लागत नाही,नेटवर्क प्रॉब्लेम,लाईट नाही अशी कारणे धान्य दुकानदाराकडून दिली जातात. दर महिन्याच्या २५ तारखेला धान्यदुकान उघडले जाते व त्यानंतर धान्य विक्री होते. धान्यदुकान पुर्णवेळ चालू नसते. तसेच प्रत्येक महिन्याला वितरीत धान्य, शिल्लक धान्य तसेच शिल्लक साठा असा बोर्ड देखील लावलेला नाही.

तसेच दक्षता कमिटीचा देखील अदयापर्यंत बोर्ड लावण्यात आलेला नाही. अशा अनेक समस्या गेली कित्येक वर्षे न्हावेली ग्रामस्थांना भेडसावत आहेत. याबाबत आज न्हावेली ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन त्यांच्याकडे सादर केले.तसेच चुकिच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणाबाबत योग्य ती कार्यवाही करून उपाययोजना करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थांना उपोषण करावे लागेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी शैलेश भगत महादेव चौकेकर,अंकित धाऊसकर हे उपस्थित होते. यावर आता सावंतवाडी तहसीलदार कोणती कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा