राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी कार्यक्रमाचा निधी रोखण्याचं महापाप शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्षद बेग यांनी केला आहे.
महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने धोरणात्मक आणि विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचा झपाटाच लावला आहे. एकीकडे ३२ दिवसांत जवळपास ७०० शासन निर्णय करण्यात आले आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती दिल्यानंतर आता राजर्षि शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. ज्या शाहू महाराजांनी सामाजिक ऐक्याचा नारा दिला, उपेक्षित दलितांना आरक्षण दिलं, शाहू महाराजांनी बंधुभावाचा विचार दिला या शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना स्थगिती दिली तसेच ज्या समाजसुधारकांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांच्या धोरणात्मक आणि विचारांच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याचं महापाप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनताच या शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय करेल.