जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमतीताई पवार लिखित अप्रतिम लेख
बालपणातले काही प्रसंग मनावर खरोखर कोरले जातात,
असे म्हटल्यास काही वावगे ठरू नये.मी मला आता
डोळ्यांसमोर दिसते आहे, साधारण सात आठ वर्षाची,
मी व माझा चुलतभाऊ रोहिदास माझ्याच वयाचा साधारण,
आम्ही दोघे जोतऱ्यावर खाली पाय सोडून बसलो आहोत.काही कळत नव्हते.आजी, माझ्या वडिलांची आई दगूमाय खाटेवर शांत झोपलेली आहे. तिच्या कपाळाला मोठा कुंकू लावला आहे.गल्लीत लोक जमले आहेत, पण तिचा मृत्यू झाला आहे हे आम्हाला कळलेच नाही. कारण मृत्यूचा अर्थच तेव्हा कळलेला नव्हता ना? मृत्यू समजण्याचेच वय नसल्यामुळे आम्ही दोघे जोतऱ्यावर पाय खाली सोडून बसलेले आठवते.
आता ही तो प्रसंग मला जसाच्या तसा दिसतो आहे.आणि
आता वाटते, कळत नव्हते तेच बरे होते ना? कळून दु:खच
वाढले असते ना? अनभिज्ञ होतो, हे किती छान झाले.
“म्हणून रम्य ते बालपण, जिथे दु:ख स्पर्श करत
नाही.मेंदू पर्यंत पोहोचतच नाही.” किती छान ना ! दु:खच
कळत नाही ही संकल्पनाच मुळी भन्नाट आहे. तिच गोष्ट
वेड्यांची असते. त्यांना ही काही कळत नाही. त्या अर्थाने
ते सुखात असतात नाही का? काश.. आपल्याला ही असे
जगता आले असते तर…लहान मुलांसारखे , दु:खाचा स्पर्श आपल्यालाही झाला नसता तर .. लहान मुलांइतकेच आपण ही सुखातच राहिलो असतो नाही का?किती छान कल्पना आहे.कसलीही जबाबदारी नसते हो?सगळं आयतं समोर येतं.
मला आठवते, आईचे दुपारचे कामधाम आटोपले की,
मला कुशित घेऊन आई तासभर विश्रांती घेत असे. मी कसली
झोपते हो? आईचा डोळा लागताच मी पसार!
मग, आमच्या शेजारीच खेटून दुमजली हवेली होती, माझ्या
चुलत आजोबांची. खाली मोठा ओटा होता. मग काय? आम्ही
चारपाच मैत्रिणी दिवसभर हुंदडायला मोकळ्या.भातुकली पासून बाहुला बाहुलीच्या लग्ना पर्यंत सारे खेळ त्या ओट्यावर
आम्ही खेळत असू. कुरमुरे शेंगदाण्याचे लाडू , परकर खोचून
नऊवारी करणे, विहिण बाईंचा मानपान सारे सारे खेळ खेळून
होत. बाभळीच्या वाळल्या शेंगा आणून जोडवी म्हणून पायात
बांधायच्या. उड्या मारायच्या, दिवे लागण होई पर्यंत आम्ही
तिथेच. शेजारीच असल्यामुळे आई निश्चिंत असायची.
अभ्यास केल्याचे मुळीच आठवत नाही हो…! दिवसभर तिच्या
मागे कामाचा रगाडा असे.अभ्यास कर हे शब्दच तिने उच्चारले
नाहीत. कित्ती छान ना? पण आज नाही हो असे चालणार?
जमाना बदलला आहे.
तिच्या मागे शेतीचा मोठा पसारा असल्यामुळे ,
सकाळी अंथरूणातून उचलून ती मला डायरेक्ट मोरीत बसवत असे. शिकेकाई तिने आधीच उकळून ठेवलेली असे. मोरीत बसले की फ्रॅाकचा बोळा डोळ्यांना लावायचा की ओतलीच तिने शिकेकाई डोक्यावर. असा तिचा कामाचा झपाटा होता.लगेच केस विंचरून वेण्या घालून मी शाळेत. कित्ती छान होते हो बालपण .! पुढे काय करायचे हे ही माहित नसे.सगळे परस्वाधिन ! तरी ही सुखात. कल्पना किती छान आहे.पुस्तके पेन्सिली सगळे मागितले की मिळत असे.हाती
दमडा नव्हता तरी किती सुखी होतो.म्हणून रम्य ते बालपण ..
पण हरवले ना? आता पैशांची ददात नाही पण तसले सुख नाही. अवलंबून राहण्याचे. मधल्या सुटीत कधी कधी २/३
मैत्रिणी घेऊन मी घरी येत असे. आई चुलीवर भाकरी थापत
बसलेली असे. एकीकडे बाजुला शेगडीवर भाजी शिजत असे.
मग काय ? घ्यायच्या ताटल्या नि बसायचे जेवायला! वाह वा!
आता ही नऊवारी चापूनचोपून नेसलेली, कुंकवाची आडवी चिरी लावलेली आई भाकरी भाजतांना मला दिसते आहे.
खूप वेळा आंघोळ करून टॅावेल गुंडाळूनच ताटलीत दुध भाकरी व थोडे ताक असा काला ती समोर ठेवत असे. आमचे
घर काटकोनात दोन दारांचे होते. पुर्वेच्या दरवाजातून नारायण
नुकतेच प्रवेश करीत असत. त्या उन्हाच्या कवडशात दोन
पायांवर बसून दुध भाकरी खाणारी मी मला अजून दिसते.
हातातून वाळू निसटावी तसे काळोखाच्या गर्भात हे सारे क्षण
गहाळ झाले.नशिब त्यातले काही क्षण तरी मनाच्या स्मृतीपटलावर हाती लागतात.हे ही नसे थोडके. सारेच आठवले असते तर किती मजा आली असती ना ?असो…
गेले ते दिन गेले.. परतून न यायचे..!
कालाय् तस्मै नम: …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३ ॲागष्ट २०२२
वेळ : दुपारी १२ :१५