जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांची अप्रतिम काव्यरचना
आला श्रावण सणांचा
बरसणाऱ्या धारांचा
नाना रुपी फुलणाऱ्या
निसर्गाच्या किमयेचा ||
क्षणी उन क्षणी धारा
इंद्रधनुचा नजारा
सुवासिक फुले पाने
गर्द हिरवा फुलोरा ||
दरवळे पारिजात
लक्ष फुलांचा नवस
बेल पत्रींनी सजली
देवघराची आरास ||
नागपंचमीचा सण
मन माहेराला जाते
झोका बांधला लिंबाला
उंच झुलूनिया येते ||
आहे शेतात वारूळ
नागराजाचे राऊळ
पूजा करुनी सयांचे
किती रंगतात खेळ ||
झिम्मा फुगड्या रासाचे
भारी वाटे आकर्षण
श्रद्धा भक्ती उत्साहाचा
आला लाडका श्रावण ||
निसर्गाची रुपे न्यारी
श्रावणात मनोहारी
देई चैतन्य उत्साह
सालभराची शिदोरी ||
ज्योत्स्ना तानवडे.पुणे