💫 लालित्य नक्षत्रवेल समूह संचालक लेखक कवी श्रीकांत दीक्षित लिखित अप्रतिम ललित लेख
_माहेर माहेर म्हणजे काय?_
_माहेरवाशीणीच्या ममतेचा सागर_
_आई, बाबा, भाऊ सारेच जण_
_कसं सांगू हे सर्व सुखाचे आगर_
_आईच्या प्रेमाची आठवण मनातील कुपीत केलेली साठवण सर्व कसं अगदी तरल भावनांचा सुरेख संगम..!! जेव्हा कधी योग येतो तेव्हा मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात. लेकीच्या दृष्टीने माहेर हे एक बंदर आहे. नौका किनार्याला लागली की मन कसं स्थिर होते. माहेर बंदर तर आई हे एक मंदीर आहे._
_माहेर म्हणजे एक झूळूझूळू वाहणारा ममतेचा झरा.. मायेचे कोंदण तर प्रेमाचे शिंपण.. मग याची ओढ कुणाला नसणार. आईचा केसावरून फिरलेला हात अचानक आरशात पहाताना स्मरणात येतो. मग मन कसं माहेरला अलगद जाऊन येते. त्यांचे नादमधूर आवाज कानावर येतात तेव्हा ते तसेच साठवून ठेवावे वाटतात. बंधूराजांची काढलेली छेड तर त्याने ओढलेली वेणी.. आठवलं की अजूनही “आई गं” असे आपोआप शब्द बाहेर पडतात. या भांडणातदेखील प्रेम दडलेले असायचे._
_सण श्रावणाचे व ओढ माहेराची. आला बंधुराय मुराळी स्वयंपाक तयासी पुरणपोळी.. मग मन धावते माहेरी. त्या भेट होईल सर्व सख्यांची मग घेता येतील झोके आठवांचे. आठवांच्या हिंदोळ्यावर झुलताना वेचता येतील क्षण आनंदाचे.._
_जाता माहेराला स्वागतास दारी तुळशीवृंदावन खुदकन हसते..तर गाय कपीला हंबरते..पळत पळत येत मनी पायाशी घुटमळते. आंगण कसं बहरून येते. जणू मनात म्हणत असेल, “आता परत मला सजवायला माझी सखी आली.” दारातील गुलाबाच्या ताटव्यावरील गुलाब किती आनंदून गेलाय. “हुश्श..” म्हणत बॅग ओसरीला ठेवताच उंबरा कसा म्हणतो, “टेक जरा..दमली असशील.” हे सर्व माहेरचे आदरातिथ्य झालं की उंबरूयातून पाऊल आत टाकायचा अवकाश, “अग ठमे, थांब तिथेच..” असं म्हणत लगबगीने येणारी आई हातात भाकरीचा तुकडा व पाण्याचा तांब्या!!.. “अग, थांब जरा तुकडा ओवाळून टाकते मग आत ये.”_
_”प्रत्येक स्त्रीला एक गाव असावे”_
_”माहेर त्याचे नाव असावे”_
_एका कवीच्या या काव्यपंक्ती किती भावनेचा उन्मळा होतो. खरंच मनाला एक हळवा कोपरा म्हणजेच माहेर. सासरला जरी असली तरी आईच्या काळजीच्या घरात सदैव रहाते मी..तर बाबांचा काळजाचा तुकडा मी. मग माहेर नावाच्या गावांत आई बाबांबरोबर “बसा तुम्ही, आवरते मी” असं म्हणणारी प्रेमळ वहिनी तर सदैव पाठीराखा भाऊ._
_अशा सुरेख माहेराची ओढ कुणाला नसणार?.._
🌻🌷🌸🌺🥀🌼⚘💖☘💞
*श्रीकांत दीक्षित.*
🌿💞☘🥀🌼🥀🌸🍁💫💝