You are currently viewing हायवे भूसंपादन च्या रखडलेल्या मोबदल्या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना

हायवे भूसंपादन च्या रखडलेल्या मोबदल्या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना

गणेश चतुर्थी पूर्वी कणकवलीतील सर्विस रोडचे खड्डे बुजवणार

महामार्ग प्राधिकरण च्या वरिष्ठ सूत्रांची माहिती

कणकवली

महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत ज्या जमीन मालकांचा भूसंपादन मोबदला द्यायचा आहे त्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू करण्यात आली आहे. भूमी राशी या नवीन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मार्फत ही मोबदला रक्कम संबंधित खातेदाराच्या थेट बँक खात्यावर जमा केली जात आहे. परंतु कणकवली प्रांताधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या काही मोबदला रक्कम वाटप करण्याच्या प्रक्रिया रखडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक कणकवली मध्येच मिसिंग प्लॉट ची निवाडा प्रक्रिया रखडली आहे. याप्रकरणी कणकवली प्रांताधिकार्‍यांना महामार्ग प्राधिकरण चे क्षेत्रीय अधिकारी श्री जयस्वाल यांनी सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महामार्ग प्राधिकरण च्या सूत्रांनी दिली. ज्या मोबदल्या संदर्भातील समस्या प्रलंबित आहेत त्या मार्गी लावल्यानंतर सर्विस वर रोड व अपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकार्‍यांच्या सूत्रांनी दिली. कणकवली शहरासह महामार्ग चौपदरीकरण कामावर ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे किंवा अन्य समस्या आहेत त्या सोडवण्याबाबत ठेकेदार कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र महामार्ग व सर्विस रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकरिता ठेकेदार कंपनीचा प्लांट सुरू होण्याची गरज आहे. पाऊस कमी झाल्यानंतर प्लांट सुरू करून हे खड्डे बुजविले जाणार आहेत. गणेश चतुर्थी पूर्वी हे खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज वरून सर्विस रस्त्यावर पडणारे पाणी बंद करण्याबाबतही ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या आहेत. शहरातील सर्विस रस्त्यालगतच्या बंद स्ट्रीट लाईट व अनेक ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्विस रस्त्या अंतर्गत बांधकाम करण्यात आलेली गटारे तुटलेल्या स्थितीत असल्याबाबतही सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण च्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. मात्र गेले काही दिवस ही अशाच प्रकारे आश्वासने दिली जात असली तरी मात्र प्रत्यक्षात ही कामे मार्गी लागलेली नाहीत. पुन्हा एकदा ठेकेदार कंपनीने महामार्ग प्राधिकरण ला दिलेली आश्वासन तरी पूर्ण होतील काय? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा