*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालीत्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ यांचा अप्रतिम ललित लेख*…..
*अस्सा सुरेख श्रावण बाई*….
*धुंद मधुमास श्रावणाचा*
*घुंगुरवाळा वारा झकास,*
*जाई जुई प्राजक्त दरवळ*
*निळ्या नभाची आरास*…..
*”घनदाटल्या अंबरातूनी*
*सरसर कोसळल्या सरी,*
*जल गंगेच्या प्रसादाने*
*ओटी वसुंधरेची भरी”.*!!!!
*आषाढ सरींनी काळ्या मातीतून फुटणा-या कोवळ्या कोंबांना जन्म देऊन आता पाठ फिरवली तोच त्यांना कुरवळायला जोजवायला हा सुरेख श्रावण आला*…….
*जो* *सणांचा सौदागर नवोन्मेष घेऊन व्रत-वैकल्याचा अधिष्ठान असणारा, लेकी सुनांना हर्ष वाटणारा, मनसोक्त झुला खेळणारा, नवचैतन्याचा हिरवा साज लेवून सखे मनभावन सुंदर श्रावण आला…..!!!! हिरव्या बहराच्या यौवनी ही सृष्टी सळसळणाऱ्या पानातून शीळ घालते.अंगी रोमांच आणणारा श्रावणाचा सुखद गारवा आणि त्याच्या उबीच्या मिठीला ही गंधित रातराणी सृष्टीच्या मंडपी कळी कळी मोहरते…!!!*..
*”श्रावणात फुलले*
*रूप राणी वसुंधरेचे*,
*हिरव्या बहरात यौवन*
*गंधित रान अत्तरांचे”*….
*हिरव्या शालुच्या पदरी*
*लाजे लाजवंती मनोहारी*,
*चिंब सरीत भिजून*
*नाचे आनंदे मयुरी*…..
*सखे असा मन भावन सुंदर श्रावण*… …!!!!!!
*अवखळ खट्याळ मृदगंध लुटेरा वारा प्रीतीला जोजवितो .कुंतली माळलेली जाईजुई सुमने हळूच अधरांना चुंबून जातात ..तारुण्याचा हिरवाकंच साज मना मोहित करतो… पाखरांचा* *किलबिलाट,मयुराचे थुईथुई नाचणे ,आणि माहेराची ओढ . नागपंचमी, राखी अशा प्रिय सणांनी श्रावण अधिकच खुलतो. गोकुळ अष्टमी ला कृष्णसखा खरोखर श्रावणसरीत चिंब चिंब भिजून गोपाळकाल्याचा आनंद भरभरून लुटतो*……
*श्रावण महिन्यात शंकराला शिवामुठ वाहिली जाते*..
*शंकराला बिल्वपत्र आणि बेलफळ ,पांढरी फुले फार प्रिय असतात*..
*आवडी शंभूचा । वार सोमवार*|
*सांगे भक्तीसार | शिवलिला*||.
*बिल्वपत्रे दूर्वा |अर्पिली राऊळा* |
*देखियला डोळा | गौरीहर*||
*शिवामुठ वाही | हर सोमवारी|*
*संकटी तू तारी | शिवशंभो*..||
*श्रावण मासी जन सोमवार व्रत करतात .पाच भाज्यांच्या नैवेद्याने केळीच्या पानावर उपवास सोडला जातो. बिल्वपत्र अर्पून ओम नमः शिवाय जपाची आराधना करतात . घराघरांतून पोथ्या वाचल्या जातात . मग राम विजय ,हरी विजय, ज्ञानेश्वरी, नवनाथ या पावन ग्रंथांचा समाप्ती सोहळा महाप्रसाद वाटून मोठ्या थाटात पार पडला जातो. असा हा मंगल श्रावणमास सर्वांना हवाहवासा स्त्रियांचा अतिशय आवडीचा श्रावण असतो .याचे खूप कुतूहल असते .एक सात्विक मास म्हणून काही लोक पुर्ण महिना उपवास करतात*.
*या श्रावण मासी पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी….. या सणाला* *नवविवाहीत मुली माहेरी येतात*.. *त्यांची मंगळागौर पुजिली जाते..* *खूप छान सोहळा सुवासिनी हळदीकुंकू देऊन साजरा करतात.अंगणी गौर नाचवली जाते.. खूप उत्साह असतो. स्त्रिया नखशिखांत नटतात. नाकी नथ, गळ्यात गळाभर वेगवेगळे छान छान दागिने, कानात कर्णफुले…. आहाहा*…..!!!! *खरोखरच सुंदर गौराईचे रूप देखणे*
*कौतुके लडिवाळ हासणे*..
*सया नटल्या सजल्या*
*माहेरात सुखावल्या*
*गौर नाचली अंगणी*
*झिम्मा फुगडी खेळल्या*!!!
.
*असा श्रावणाचा आनंद लुटत स्रिया रात्री जागर करतात*. *मग झिम्मा, फुगड्या ,फेरांनी आंगणे दुमदुमून जातात. असा हा लेकी सुनांचा नागपंचमी सण आनंदाचा, बंधू प्रेमाचा ,राखीचा, अतुट बंधनाचा*..!!!
*गोडवा श्रावणाचा*
*पुरणपोळीत चाखला*,
*बंधू प्रेमाच्या तबकी*
*चांद पुनवेचा हासला…..*…
*अशा सुंदर श्रावणी*
*जाते सपान पेरीत*
*माहेराच्याआभाळ मायेत*
*वारसा संस्काराचा जपत*….
*असा श्रावणाचा मंगलमय वारसा जपत सुवासिनी मनमुराद आनंद लुटतात.* *सुग्रास गोडधोड आवडीने करतात . आणि मग म्हणतात असं माहेर सुरेख बाई*!!!!…
*असा सुंदर श्रावण कधी सखीच्या मेंदीत, तर कधी पुरणाच्या खमंग पोळीत, प्राजक्ताच्या सड्यात, मंगळागौरीच्या हळदीकुंकवात , शालू पैठण्यांच्या झगमगाटातून,तर कुंतली माळलेल्या गज-यातून ,तर उंच उंच झुल्याच्या हर्ष वा-यातून हा साजिरा गोजिरा श्रावण सौंदर्याने नटून जातो.. मना मोहिनी घालतो… सखे अस्सा सुरेख श्रावण*…!!!
*दुरावलेल्या सख्या अशा सणांमुळे एकमेकींना भेटतात आणि मग तो आनंद काही औरच. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा नात्यांच्या गोडव्याला हा संस्काराचा गोफ सुंदर शोभून दिसतो . आणि मग जीवनाचा निखळ आनंद घेता येतो. एकमेकांविषयीचा जिव्हाळा आदर भाव जपला जातो. आणि मग माय माऊलीच्या भरभरून आशीर्वादाने सासरचा दिवा अखंड तेवत असतो, तो सुसंस्कारानेच…!!!! खळखळणाऱ्या झऱ्यांसारखं स्वच्छ मन आनंदून जातं. मोहून जातं.अशा या मन भावन श्रावणात*….
*सोळा शृंगारी नटली नार*
*निसर्गाच्या अविष्कारी*,
*वृक्षवेलिंवर झुले मनसोक्त*
*श्रावणाची सुंदर अदाकारी*…
*घनश्याम हा सावळा*
*राधा राणी वसुंधरा*
*पुरवितो गं डोहाळे*
*सप्तरंगी अविष्कारा*!!!..
*श्रावणाचे कुतुहल म्हणजे नभी इंद्रधनू आणि उन्हात पडणारा पाऊस*. *ही उन पाऊस खेळी, डोंगर द-यांची शान, उंचावरून कोसळणारे धबधबे, वृक्ष वेलींच्या पानांवर पडणारे शुभ्र स्फटिकासारखे दवबिंदू किती नयनरम्य नजराणा!!!!*.
*हिरव्या रानी जाई हरकून मनःशांती सकून*!
*असा हा साजिरा गोजिरा श्याम सावळा रेखाटून मेंदीत लाली लज्जेच्या मोहरतो*…
*पूर्वी स्रियांना खूप सासुरवास असायचा. स्त्रियांना बंधने असायची. स्वातंत्र्य नव्हतेच. जणू सासरच्या अंगणातील दावणीला बांधलेली ही गरीब गायच होती. हेच विधान तिच्यासाठी वापरले जात असे. मग असे सणवार या माहेरवाशिणीला माहेरपणाचा आनंद मिळवून देत .सासुरवासाचा सारा शीणभाग या चार दिवसांच्या माहेराच्या पाहुणचाराने निघून तर जायचाच पण या माहेराच्या गाठीभेटीनं तनमन आनंदी व्हायचं. थोरामोठ्यांचे दडपण,रितीभातींचे अवडंबर…स्री चुल आणि मुल हेच आयुष्य जगत असे.आणि मग हे असे सण त्या सासुरवाशिनींना आनंदाची पर्वणी घेऊन येत असत.. आता काळ जरी बदलला असला तरी आजची स्त्री स्वतंत्र असून ती आपल्या* *मर्जीनुसार जीवन जगत आहे. आपली मराठी संस्कृती जपत आहे .येणारे सण छान साजरे करत आहे. आजही नागपंचमीला गौर पुजिली जाते. अंगणी झुला बांधुन सख्यांसोबती नागपंचमी खेळली जाते .शालु पैठण्या नेसून स्त्रिया या सणाचा आनंद लुटतात.आणि मग हातातल्या मेंदीत यौवन अजूनच खुलून जातं. अशा सुंदर श्रावणाला अध्यात्माची सांगड असल्याने भक्तिरसाच्या सुगंधात तो दरवळून जातो…. ..कथा पुराणातून समाज प्रबोधन केले जाते . .अशा या पावन सुंदर श्रावणी आपणही व्रतस्थ होऊया आणि समाज कल्याणाचा हेतू ठेवून सहकार्याचा हातभार लावूया. निसर्गाबरोबर आपणही मनसोक्त हसूया… चेहऱ्याचे खरे सौंदर्य कर्तुत्वाने झळकू या. मग हाताची मेहंदी अधिक गडद होऊन प्रीत सागरी सरोज फुलू लागतील…. मने आनंदे नाचू लागतील. जीवन बाग हास्याचे खत घालून बहरू लागेल…!!!अवनी मेघांचे मनातील गुज या सुंदर श्रावणाने खोलू लागतील…. प्रीतसागरा उधाण येऊन हर्षाची फुले उधळू लागतील*..
*अस्सा सुरेख श्रावण बाई*!!!!!!!
*”चुकू दे हा गंगाधरा*
*फेरा जन्म-मरणाचा,*
*तरू दे भवसागर*
*मार्ग मोकळा मोक्षाचा*”…
*”भाव फुले ही शब्दांची*
*अर्पिते तुजला जटाधारी*
*विनवणी पुष्पा करी*
*सुखे नांदो सृष्टी सारी”*…
*लेखिका*..
*सौ पुष्पा सदाकाळ भोसरी* *पुणे9011659747*.